Nag Ashwin Compares Mrunal Thakur to Madhubala & Smita Patil : मृणाल ठाकूर मनोरंजनविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती तिच्या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. मृणालने आतापर्यंत दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे दाक्षिणात्य इंडस्ट्रीत तिची खूप क्रेझ आहे. अनेक कलाकार मंडळी तिचं कौतुक करत असतात. अशातच आता ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाचा दिग्दर्शक नाग अश्विनने मृणालचं कौतुक केलं आहे.
मृणालचा Dacoit हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला. हा चित्रपट दाक्षिणात्य भाषांसह हिंदीतही रिलीज झाला आहे. अशातच आता चित्रपटाच्या एका कार्यक्रमात दिग्दर्शक नाग अश्विनने हजेरी लावलेली. यावेळी त्याने मृणालचं फक्त कौतुक केलं नाही तर तिला चित्रपट निवडताना विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सल्लासुद्धा दिला. यावेळी त्याने मृणालची लोकप्रिय दिवंगत अभिनेत्री मधुबाला आणि स्मिता पाटील यांच्याशी तुलना केली.
मृणालला दिग्दर्शकाने दिला सल्ला
‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार नाग अश्विन म्हणाला, “मृणाल, मला वाटतं तू खूप अप्रतिम आहेस. तू जे काम निवडतेस त्याबाबत मी नेहमीच खूप काळजी करत असतो. जेव्हा तू काही वेगळेपण नसलेलं काम करतेस, तेव्हा मला वाटतं, ती हे का करतेय? तिने यापेक्षा खूप चांगलं काम केलं पाहिजे कारण त्यासाठी तू पात्र आहेस.”
मधुबाला व स्मिता पाटील यांच्याशी तुलना
मृणालचं कौतुक करत नाग अश्विन पुढे म्हणाला, “जेव्हा तू भावनिक पात्र साकारतेस तेव्हा मला वाटतं तू मधुबाला आणि स्मिता पाटील यांच्या काळातील अभिनेत्रींसारखी आहेस; अशा प्रकारचे कलाकार खूप कमी असतात. म्हणून कृपया उगाच काहीही काम करू नकोस, आणि चांगलंच काम निवड.”
मृणाल ठाकूरने अभिनयाचा कोणताही वारसा नसताना अभिनय क्षेत्रात स्वबळावर वेगळी ओळख निर्माण केली. अलीकडेच तिने रणवीर अलाहाबादियाला मुलाखत दिली. त्यावेळी तिने ती रणवीर सिंहमुळे या इंडस्ट्रीत आली आणि तो तिच्यासाठी ‘लकी चार्म’ आहे असं म्हटलं. अभिनेत्रीने रणवीरसह एका जाहिरातीत काम करण्याचा अनुभव सांगितला.
मृणाल रणवीरबद्दल म्हणाली, “रणवीर सिंह माझा लकी चार्म आहे. कारण- मी त्याच्यामुळेच आज या इंडस्ट्रीत आहे. मी त्याच्याबरोबर एका जाहिरातीमध्ये काम केलं होतं. एका हेअर ब्रँडसाठी मॉडेल म्हणून मी त्याच्याबरोबर काम केलं आणि जेव्हा ती जाहिरात प्रदर्शित झाली त्यानंतर मला चित्रपटांसाठी विचारणा होऊ लागली. म्हणून मी त्याला याचं श्रेय देते. त्याने मला खूप मदत केली आहे. तो खूप सकारात्मक व्यक्ती आहे.”
