‘अस्तित्व’ आयोजित दिवंगत मु. ब. यंदे ‘कल्पना एक अविष्कार अनेक’ या एकांकिका स्पर्धेत दिशा थिएटर्स-ठाणे यांनी सादर केलेली ‘मै वारी जावा’ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली.
नरिमन पॉइंट येथील ‘एनसीपीए’मध्ये स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच पार पडली. यंदाच्या स्पर्धेसाठी कवी आणि गीतकार गुलजार यांची ‘अलाव’ही कविता विषय म्हणून सुचविण्यात आली होती. स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाच एकांकिका सादर झाल्या. अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून प्रतिमा कुलकर्णी, जयंत पवार, वैभव जोशी, विद्याधर पाठारे, हृषीकेश जोशी यांनी काम पाहिले.
‘फिनिक्स’-मुंबई यांनी सादर केलेली ‘मन्वंतर’ या एकांकिकेला दुसरे पारितोषिक मिळाले. याच एकांकिकेच्या लेखनासाठी स्वप्निल चव्हाण यांना सवरेत्कृष्ट लेखक म्हणून गौरविण्यात आले. ‘मै वारी जावा’मधील प्रसाद दाणी यांची सवरेत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड करण्यात आली.
सवरेत्कृष्ट प्रकाशयोजना- शीतल तळपदे (टर्मिनल), सवरेत्कृष्ट नेपथ्य-संदेश जाधव (ऋणानुबंध), सवरेत्कृष्ट संगीतकार-मल्हार फडके, संतोष वाडेकर (मन्वंतर) यांची निवड करण्यात आली. स्पर्धेचे संयोजन ‘अस्तित्व’चे रवी मिश्रा यांनी केले होते. किर्तीकुमार नाईक यांनी सूत्रसंचालन केले, तर समन्वयक म्हणून सुमित पवार यांनी काम पाहिले.