Kamal Haasan Singeetham Srinivasa Rao movie Sing Geetham: सुपरस्टार कमल हासन यांचा एक बहुप्रतिक्षित चित्रपट तब्बल ४५ वर्षांनंतर अखेर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ९४ वर्षांचे जगातील सर्वात ज्येष्ठ दिग्दर्शक सिंगीथम श्रीनिवास राव दिग्दर्शित ‘सिंग गीथम’ (Sing Geetham) हा सिनेमा येत्या ११ जून रोजी रिलीज होत आहे. चेन्नईतील एका प्री-रिलीज कार्यक्रमात कमल हासन यांनी आपल्या या गुरुतुल्य दिग्दर्शकासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. “जेव्हा या चित्रपटाची चर्चा झाली तेव्हा मी फक्त २० वर्षांचा होतो आणि आज मी ७१ वर्षांचा आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कमल हासन काय म्हणाले?

चेन्नईत एका प्री-रिलीज कार्यक्रमात या चित्रपटाबद्दल बोलताना कमल हासन यांनी दिग्दर्शकांबरोबरच्या पहिल्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. कमल हासन म्हणाले, “आमची पहिली भेट मुंबईत झाली होती. तिथेच आमचा पहिला चित्रपट ठरला. त्या दिवशी आम्ही दोन चित्रपटांबद्दल बोललो होतो, एक ‘पुष्पक विमान’ आणि दुसरा ‘सिंग गीथम’. आम्ही याबद्दल चर्चा करत होतो, तेव्हा मी फक्त २० वर्षांचा होतो. आज मी ७१ वर्षांचा आहे आणि अखेर मी हा चित्रपट पाहू शकणार आहे. काही कल्पना या अजरामर असतात. दिग्दर्शकाकडे कल्पनांचा खजिना आहे. त्यामुळेच त्यांच्यासाठी वय हा केवळ एक आकडा आहे.”

सिंगीथम श्रीनिवास हे जगातील सर्वात ज्येष्ठ आणि अद्यापही कार्यरत असणारे चित्रपट निर्माते आहेत. त्यांच्या सन्मानार्थ आयोजित एका कार्यक्रमात कमल हासन सहभागी झाले होते. ९४ वर्षांच्या सिंगीथम श्रीनिवास राव यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी ‘ज्यूरर २’ (२०२४) या चित्रपटाचे दिग्दर्शन करून क्लिंट ईस्टवूड यांचा रेकॉर्ड मोडला.

१९५७ साली रिलीज झालेला मायाबाजार

९४ वर्षीय सिंगीथम श्रीनिवास राव यांचा आगामी चित्रपट ‘सिंग गीथम’ ११ जून रोजी रिलीज होत आहे. या चित्रपट निर्मात्यासोबतच्या आपल्या प्रदीर्घ प्रवासाबाबद्दल बोलताना कमल हासन म्हणाले, “मला वाटतं ‘मायाबाजार’ हा चित्रपट चेन्नईत १२ एप्रिल १९५७ रोजी रिलीज झाला होता. आता ११ जून रोजी, म्हणजे दोन महिन्यांनंतर हा चित्रपट येत आहे. मला खात्री आहे की त्यांना आजही पहिल्या चित्रपटावेळी वाटलं तसंच वाटत असेल.”

“काहीही बदललेलं नाही आणि सिनेमा आजही त्यांच्याबरोबर आहे. हे खूप खास आहे.” सिंगीथम यांच्याबरोबर मी जेव्हा पहिल्यांदा काम केलं, तेव्हा २१ वर्षांचा होतो, असा खुलासा कमल हासन यांनी केला. कमल हासन पुढे म्हणाले, “मला माहित नाही की आताच्या डायरेक्शन टीममध्ये सर्वात लहान वयाचं कोण आहे? मी २१ वर्षांचा असताना ते सगळं केलं होतं जे आता ही तरुण मुलं करत आहेत. मी नकळत आणि स्वतःच्या इच्छेने त्यांचा सहाय्यक दिग्दर्शक बनलो होतो. योगायोगाने मी या चित्रपटाचा निर्माताही आहे, पण माझा मुख्य उद्देश त्यांच्यासोबत काम करणे हाच होता.”