तामिळनाडूतील सध्याची राजकीय स्थिती पाहता कमल हसन हे या महिनाअखेरीला नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचे म्हटले जात आहे. इंडिया टुडेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ‘तामिळनाडूतील राजकारणात बदल होण्याची गरज असून मला तो बदल आणायला आवडेल,’ असे त्यांनी सांगितले. राजकारणातील आपल्या प्रवेशाबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘मला माहित नाही हा बदल किती लवकर होईल, पण ते होणे आवश्यक आहे,’ असे ६२ वर्षीय हसन म्हणाले.

Happy birthday Ramya Krishnan: जाणून घ्या रम्याच्या प्रॉपर्टी आणि मानधनाबद्दल

‘मी जलद बदल होईल असे आश्वासन देत नसून एक बदलाची प्रक्रिया नक्कीच सुरू होईल याचे आश्वासन देतो. माझ्या पक्षाला मतदान केल्यानंतर मला नाकारण्यासाठी तुम्हाला पाच वर्षांची वाट पाहावी लागणार नाही. जर माझे काम तुम्हाला आवडले नाही तर जनता त्वरित मला काढून टाकू शकते.’ त्यांच्या बोलण्याचा रोख राजकारणात असलेल्या भ्रष्टाचारा विरोधात होता. राजकारणात मी राहीन किंवा भ्रष्टाचार राहील, दोघंही एकत्र राहू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

सध्याच्या राजकीय पक्षांपैकी एकही पक्ष माझ्या विचारधारेशी जुळणारा नाही. कोणताही राजकीय पक्ष हा विचारांवर आधारीत असतो. त्यामुळे माझे विचार हे सध्याच्या कोणत्याही पक्षाशी जुळतील असे मला वाटत नाही.

तामिळनाडूमधील विरोधी पक्ष द्रमुक अथवा सत्तारूढ अभाअद्रमुक विरोधात पक्ष उभारण्याचा त्यांचा मानस असल्याचे दिसते. कमल हसन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांच्या संपर्कात असून,  गेल्या आठवड्यात त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांचीही भेट घेतली होती.