Kamal Haasan’s open letter to Indian film industry: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना इंधनाची बचत करण्याचे आवाहन केले आहे. जगभरात पेट्रोल आणि डिझेल अत्यंत महाग झाल्यामुळे इंधनाची बचत करणे आणि पेट्रोल व डिझेल खरेदीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवणे ही आपली जबाबदारी असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी केले होते.

पंतप्रधान मोदींच्या आवाहनात सात मुद्द्यांचा समावेश होता. ते म्हणाले होते की, शक्य तिथे वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या, वर्षभरासाठी सोने खरेदी टाळा, सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करून पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, स्वयंपाक बनवण्याच्या तेलाचा (खाद्यतेलाचा) वापर कमी करा, रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळा, स्वदेशीचा अधिकाधिक वापर करा, विदेशी उत्पादनं टाळा, वर्षभरासाठी विदेशी प्रवास टाळा अशी आवाहने पंतप्रधान मोदींनी केल्यानंतर देशभरात याची चर्चा सुरू आहे.

कमल हासन नेमकं काय म्हणाले?

आता लोकप्रिय अभिनेते व निर्माते कमल हासन यांचे एक खुले पत्र चर्चेत आले आहेत. पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर त्यांनी हे पत्र लिहिले आहे. अनेक चित्रपटांचे शूटिंग परदेशात होते, त्या संबंधित त्यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यांनी या पत्रात त्यांनी चित्रपटांचे वाढते बजेट, मोठे ताफे (entourage), अनावश्यक खर्च यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच, इंधन, ऊर्जा, वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढत असल्याने भारतीय चित्रपटसृष्टीसमोरही मोठे आव्हान असल्याचे त्यांनी लिहिले. परदेशात शूटिंग करताना अनावश्यक खर्च होतो आणि त्यामुळे हा खर्च टाळण्याचे आवाहन त्यांनी चित्रपटसृष्टीला केले आहे. तसेच, परदेशातील महागड्या शूटिंगबाबत पुनर्विचार करण्याबद्दल सांगितले आहे.

कमल हासन यांनी या पत्रात स्पष्ट केले की, या वाढत्या खर्चाचा भार कामगारांवर पडू नये. त्यांनी लिहिले, “या परिस्थितीचा परिणाम निर्माता, कामगार, थिएटर मालक, वितरक, वित्त पुरवठादार आणि संपूर्ण उद्योगावर होणार आहे. पण, चित्रपटसृष्टी टिकवून ठेवायची असेल, तर खर्चातील प्रत्येक रुपया चित्रपटासाठी उपयुक्त ठरला पाहिजे. कोणत्याही आर्थिक तणावाचा परिणाम कामगारांच्या पगार, सुरक्षितता, सन्मान, अन्न, प्रवास, निवास किंवा कामकाजावर होऊ नये. तसेच, अनावश्यक खर्च, चुकीचे नियोजन, मोठे ताफे, गरज नसलेले परदेश दौरे, शूटिंगमधील विलंब आणि उद्देशापेक्षा जास्त खर्च या गोष्टींमध्ये सुधारणा होऊ शकते.”

याबरोबरच त्यांनी असेही लिहिले की, निर्माते, अभिनेते, दिग्दर्शक, संघटना, स्टुडिओ, थिएटर मालक, वितरक, OTT प्लॅटफॉर्म आणि इतर संबंधितांनी एकत्र येऊन या आर्थिक आव्हानांना कसे सामोरे जाऊ शकतो, यावर चर्चा करावी. तसेच त्यांनी काही उपायही सुचवले. त्यांनी लिहिले की अधिक शिस्तबद्ध शूटिंग, लक्झरी आणि मोठ्या ताफ्यावरील खर्च कमी करणे, गरज नसलेले परदेशातील शूटिंग टाळणे, ऊर्जेची बचत करणे आणि सेटसाठी साहित्याचा पुनर्वापर करणे या गोष्टी केल्या जाऊ शकतात.

शेवटी त्यांनी असेही लिहिले की, जर आपण आज सिनेमाच्या अर्थकारणाचे संरक्षण केले, तर सिनेमाचे भविष्य सुरक्षित राहील.

हे पत्र लिहिताना त्यांनी एफआयसीसीआय इंडिया, फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया, साऊथ इंडियन फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स, तेलुगू फिल्म, नॉर्थ इंडियन मोशन पिक्टर असोशिएशन, केरला फिल्म प्रोड्युसर असोसिएशन, तेलुगु फिल्म प्रोड्युसर्स कौन्सिल, कन्नड फिल्म अशा चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या संस्थांना टॅग केले आहे.

त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांचे कौतुक करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. आता कमल हासन यांच्या या आवाहनानंतर चित्रपटांचे परदेशात शूटिंग होणे थांबेल का, निर्माते यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी आवाहन केल्यानंतर त्याची जनसामान्यांपासून ते श्रीमंतापर्यंत सगळीकडे चर्चा होताना दिसली. अनेकांनी त्यावर टीकाही केली.