बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. नुकतंच आलियाने एका प्रसिद्ध कपड्याच्या ब्रँडची जाहिरात केली आहे. तिची ही जाहिरात प्रचंड व्हायरल झाली असून यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. या जाहिरातीत आलिया भट्ट ही कन्यादान प्रथेविषयी बोलताना दिसत आहे. मात्र या जाहिरातीमुळे हिंदू धर्माचा अपमान झाल्याचं सांगत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतनेही तिच्यावर टीका केली आहे. “एखादी वस्तू विकण्यासाठी कोणत्याही धर्म, अल्पसंख्याक आणि बहुसंख्य गोष्टीच्या राजकारणाचा वापर करु नये,” असा सल्ला कंगनाने दिला आहे.

आलियाच्या या जाहिरातीवर कंगनाने प्रचंड नाराजी दर्शवली आहे. याबद्दल तिने मोठी पोस्ट लिहित मान्यवर या प्रसिद्ध ब्रँडवरही टीका केली आहे. “जेव्हा सीमेवर कोणीही शहीद होतं त्यावेळी त्याचे वडील मोठ्याने ओरडतात आणि मी ठिक आहे, मला काहीही झाले नाही, असे सांगतात. हे दृश्य आपण टीव्हीवर अनेकदा पाहतो. मला दुसरा मुलगा आहे. मी तो देखील पृथ्वी मातेसाठी अर्पण करेन. त्यानुसारच कन्यादान किंवा पुत्रदान यामुळे समाजातील त्यागाची प्रवृत्ती समोर येते. जेव्हा एखाद्याने दानधर्माची कल्पना नीच पातळीवर ठेवण्यास सुरुवात केली असेल, त्यावेळी रामराज्याच्या जीर्णोद्धाराची वेळ आली आहे, असे समजून जा,” असे कंगनाने यात म्हटले आहे.

“हिंदू धर्माची आणि त्यांच्या चालीरितींची चेष्टा करणे थांबवा. पृथ्वी आणि स्त्री दोघांनाही शास्त्रात आई म्हटले जाते. त्यांची पूजा केली जाते. त्यांना एक मौल्यवान मालमत्ता आणि अस्तित्वाचे केंद्र मानण्यात काहीच नुकसान नाही,” असा सल्लाही कंगनाने दिला आहे.

त्यामुळे मी सर्व ब्रँड्सला नम्र विनंती करते की, “एखादी गोष्ट विकण्यासाठी धर्म, अल्पसंख्याक, बहुसंख्य राजकारणाचा वापर करू नका. या फूट पाडणाऱ्या कल्पना आणि जाहिरातींमुळे भोळ्या ग्राहकांना गोंधळात टाकू नका,” असे कॅप्शन लिहित तिने याप्रकरणी नाराजी दर्शवली आहे. या पोस्टमध्ये तिने मान्यवर आणि कंगना या दोघांनाही टॅग केले आहे.

जाहिरातीत नेमकं काय?

आलिया भट्ट ही नुकतंच मान्यवर या कपड्यांच्या जाहिरातीत झळकली आहे. या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आलिया नववधूच्या पोशाखात लग्न मंडपात दिसत आहे. यात आलिया तिच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य तिच्यावर किती प्रेम करतात, हे सांगताना दिसत आहे. मात्र या जाहिरातीदरम्यान तिने विवाह सोहळ्यातील कन्यादानाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुलीला परक्याचे धन का मानले जाते? असा प्रश्न तिने विचारला आहे. “मुलगी ही दान करण्याची गोष्ट नाही, त्यामुळे कन्यादान नाही कन्यामान,” असा संदेश या व्हिडीओतून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आलिया भट्टचा हा व्हिडीओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. तिच्या या व्हिडीओला प्रचंड लाईक्स आणि कमेंट केले जात आहे. मात्र काहींना हा व्हिडीओ अजिबात आवडलेले नाही. अनेकजण या जाहिरातीमुळे आलियाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आलिया भट्टने हिंदू धर्माचा अपमान केला आहे, असे काही नेटकऱ्यांचे म्हणणं आहे.

‘कन्यादान’ च्या नवीन आयडियावरुन आलिया भट्ट ट्रोल, हिंदू धर्माचा अपमान केल्याने नेटकरी संतापले!