Kangana Ranaut on Nora Fatehi Sanjay Dutt Song Controversy : नोरा फतेही व संजय दत्त यांचं ‘सरके चुनर तेरी सरके’ हे गाणं वादात अडकलं आहे. या गाण्याचे बोल अश्लील असल्याने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. प्रचंड वादानंतर निर्मात्यांनी हे गाणं युट्यूबवरून डिलीट केलं आहे. ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्याच्या वादाबद्दल अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे.

कन्नड पॅन इंडिया चित्रपट ‘KD: द डेव्हिल’ मधील ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्यावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या गाण्यात नोरा फतेही आणि संजय दत्त दिसणार आहेत. या गाण्याचे शब्द अश्लील असल्यामुळे सर्व स्तरांतून त्यावर टीका होत आहे. या वादावर बोलताना कंगना रणौतने कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या

नोरा फतेहीच्या या गाण्यावर प्रतिक्रिया देताना कंगना म्हणाली, “बॉलीवूडने अश्लीलता आणि लोकांचे लक्ष वेधून घेण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. संपूर्ण देश या गाण्याचा निषेध करत आहे, त्यांच्यावर टीका करत आहे. पण मला वाटत नाही की त्यांना याची काही लाज वाटत असेल, कारण आपण लहानपणापासून अशी गाणी ऐकत आलो आहोत.”

बॉलीवूडवर कडक निर्बंध लावण्याची गरज

कंगना पुढे म्हणाली, “मध्ये काही वेळा अशा गाण्यांवर बंदी घालण्यात आली होती. पण आता मला असं वाटतं की त्यांच्यावर अधिक कडक कारवाई व्हायला हवी. खरं तर आता कुटुंबाबरोबर असताना टीव्ही चालू करणंही कठीण झालंय. अशा प्रकारची अश्लीलता आणि असभ्यपणा रोखण्यासाठी बॉलीवूडवर कडक निर्बंध लावण्याची गरज आहे.”

गीतकाराची प्रतिक्रिया

या गाण्याचे गीतकार म्हणून रकीब आलमचं नाव दाखवलं जातंय. पण हे गाणं आपण लिहिलं नसून फक्त भाषांतर केलंय, असं त्यांनी म्हटलं. निर्मात्यांना असं अश्लील गाणं न करण्यास सांगितलं होतं, पण त्यांनी ऐकलं नाही. आता निर्मात्यांनी युट्यूबवरून हे गाणं हटवलं आहे. आपण गाण्याचे नवीन बोल लिहून दिले असून हे गाणं पुन्हा रिलीज केलं जाईल, त्याचबरोबर निर्माते माफीही मागणार आहेत, असं रकीब आलम यांनी सांगितलं.

दरम्यान, आता या गाण्याबद्दल निर्माते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.