Kangana Ranaut Kriti Sanon Ad Controversy : अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौत यांनी अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या रक्षाबंधनच्या जाहिरातीवर टीका केली आहे. या जाहिरातीमध्ये ‘कॉकटेल २’ चित्रपटाच्या अभिनेत्रीने परिधान केलेल्या कपड्यांमुळे सध्या सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर क्रिती सॅनोननेही प्रतिक्रिया दिली आहे.

क्रिती सेनॉन नुकतीच एका ज्वेलरी ब्रँडच्या रक्षाबंधनच्या जाहिरातीत दिसली होती. या जाहिरातीत सण साजरा करताना तिने ऑफ-व्हाइट रंगाचा ब्रॅलेट-स्टाईल ब्लाउज, त्यावर केप आणि ड्रेप्ड स्कर्ट परिधान केला होता. सोशल मीडियावरील एका वर्गाने या ब्रँडवर भारतीय सणांची चेष्टा केल्याचा आरोप केला, तर काहींनी क्रितीच्या कपड्यांचं वर्णन अतिशय तोकडे असं केलं. आता कंगना रणौतनेही या वादात उडी घेतली आहे.

कंगना रणौत काय म्हणाल्या?

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये क्रिती सेनॉनचे थेट नाव घेतले नसलं, तरी तिने क्रितीवर या ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातीवरून सुरू असलेल्या वादावरच भाष्य केल्याचं स्पष्ट केलं आहे. तिने विचारलं, “महिलांसाठी हा खूप चांगला काळ आहे, आपल्या कपाटात वेगवेगळ्या कपड्यांचे अनेक पर्याय आहेत. आजची महिला ही जागतिक महिला आहे. कॉकटेल ड्रेसेसपासून ते लहेंगा चोली, जीन्स ते साडी आणि बिकिनीपासून ते सलवार कमीजपर्यंतचे अनेक पर्याय आज उपलब्ध असताना, तुम्ही तुमच्या भावाला बिकिनी किंवा अंतर्वस्त्रांमध्ये राखी का बांधाल? तुमचे इतर स्टायलिंगचे पर्याय कुठे गेले?”

कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या जाहिरातीला हेतूपूर्वक विचित्र आणि संशयास्पद देखील म्हटलं आहे. कपड्यांच्या निवडीव्यतिरिक्त, या जाहिरातीत कुत्र्याला राखी बांधल्यामुळेही ऑनलाइन टीका झाली होती. जाहिरातीत क्रिती एका कुत्र्याला, तो तिच्यावर भुंकल्यानंतर, पारंपारिक राखी बांधताना दिसत आहे.

क्रिती सॅनोनची प्रतिक्रिया काय?

क्रितीने याबाबत इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. ती म्हणाली, “सणांचं खरं सार तुम्ही घालता त्या कपड्यांमध्ये नसतं, तर तुम्ही परंपरांबद्दल बाळगता त्या भावना आणि आदरामध्ये असते. रक्षाबंधन हे संरक्षणाचं बंधन आहे. मी आणि माझी बहीण एकमेकींना राखी बांधतो. आम्हाला ठाऊक आहे की, आम्ही एकमेकींचे रक्षण कोणत्याही भावापेक्षा कमी करणार नाही. आम्ही एकमेकींच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करतो. आणि आमच्यासाठी, ही प्रार्थना आणि वचन आमच्या कुत्र्यांसाठीही आहे! शेवटी, तेही आमचं कुटुंबच आहेत! तसंच, आपण महिलांना काय घालावं हे सांगणं कधी थांबवणार आहोत? वर्षानुवर्षे पारंपरिक फॅशन बदलत गेली आहे, पण तरीही स्त्रीचा तिच्या संस्कृतीबद्दलचा आदर फक्त तिच्या कपड्यांवरूनच मोजला जातो! संस्कृती आणि परंपरा तिच्या हृदयात असतात, तिच्या गळ्याच्या नेकलाईनमध्ये नाही!”