एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली बदनामी केल्याप्रकरणी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणावतविरोधात दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश अंधेरी महानगर दंडाधिकाऱ्यांनी शनिवारी जुहू पोलिसांना दिले.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने विनाकारण आपल्याबाबत आक्षेपार्ह विधान केले, असा अख्तर यांचा आरोप आहे. त्यांनी गेल्या महिन्यात अंधेरी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे कंगनाविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली होती.

त्यांच्या तक्रारीवर शनिवारी सुनावणी झाली. त्या वेळी कंगनाने केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे अख्तर यांना रोष व्यक्त करणारे संदेश आले. कंगनाच्या वक्तव्यामुळे अख्तर यांच्या समाजातील प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचला आहे. त्यामुळेच आक्षेपार्ह वक्तव्य करून बदनामी केल्याप्रकरणी कंगनाविरोधात कारवाई करावी, असे अख्तर यांचे वकील निरंजन मुंदरगी यांनी न्यायालयाला सांगितले. त्यांनी या प्रकरणी फौजदारी दंडसंहितेचे कलम २०२ लागू करण्याची विनंती केली. त्यानुसार अख्तर यांना वाहिनीने बोलावून त्यांचे निवेदन सादर करण्याची संधी देण्याचे वा त्यांच्या तक्रारीच्या चौकशीचे पोलिसांना आदेश देण्याची मागणी केली.

‘१६ जानेवारीपर्यंत अहवाल सादर करा’

कलम २०२ नुसार, महानगर दंडाधिकारी स्वत: तक्रारीची चौकशी करू शकतात वा पोलीस व तत्सम यंत्रणेला चौकशीचे आदेश देऊ शकतात. न्यायालयाने अख्तर यांच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर जुहू पोलिसांना तक्रारीच्या चौकशीचे आदेश दिले. तसेच १६ जानेवारीपर्यंत चौकशीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.