Lockdown : ‘बॉलिवूड क्वीन’ने गरजूंना दिला मदतीचा हात

लॉकडाउनच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत

करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांच्या समस्येमध्ये आणखीनच वाढ झाली आहे. त्यामुळे या मजुरांच्या मुलभूत गरजांसोबतच आर्थिक समस्याही दूर व्हावी यासाठी काही व्यावसायिक आणि सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. यात आता अभिनेत्री कंगना रणौतने १० लाखांची मदत केल्याचं सांगण्यात येत आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत राहणाऱ्या कंगनाने ‘फिल्म एम्लॉइज फेडरेशन ऑफ साऊथ इंडिया’ आणि तिच्या आगामी ‘थलाइवी’च्या सेटवर काम रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक मदत केली आहे. कंगना  तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये काम करत आहे. या चित्रपटामध्ये तिची मुख्य भूमिका असून ता जयललिता यांच्या भूमिकेत झळकणार आहे.

कंगनाने ‘फिल्म एम्लॉइज फेडरेशन ऑफ साऊथ इंडिया’साठी पाच लाख रुपयांची मदत केली आहे. तर ‘थलाइवी’च्या सेटवर रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांसाठी उर्वरित पाच लाखांची मदत केली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

दरम्यान, लॉकडाउनच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे बॉलिवूडपासून दाक्षिणात्य कलाविश्वापर्यंत अनेक कलाकारांनी त्यांना शक्य होईल तशी मदत केली आहे. यात रजनीकांत,विजय सेतुपति, महेशबाबू, चिरंजीवी या सारख्या दिग्गज कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kangana ranaut donates 10 lakhs for labours amid coronavirus ssj

ताज्या बातम्या