बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता कंगनाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नुकतंच सोशल मीडियाच्या माध्यामातून तिने याबाबतचा खुलासा केला आहे. तिने काही दिवसांपूर्वी मुंबई हल्ल्यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती आणि त्यानंतर मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, असे तिने यात म्हटलं आहे. तसेच कंगनाने अशा लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

कंगनाने नुकतंच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यातील पहिला फोटोत ती तिच्या आई आणि बहिणीसोबत सुवर्णमंदिरात जात असल्याचे दिसत आहे. तर पुढील फोटो हे संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याप्रकरणी आहेत. या सर्व फोटोंसोबत तिने सर्व गोष्टींबाबत मौन सोडत भाष्य केले आहे.

यावेळी कंगना म्हणाली, “मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांचे स्मरण करुन मी लिहिले की, देशद्रोह्यांना कधीही माफ करू नका किंवा विसरु नका. या घटनेत देशातील काही अंतर्गत देशद्रोहींचा हात असू शकतो. देशातील अनेक देशद्रोही अशाप्रकारे विरोधकांना मदत करतात, त्यामुळेच अशाप्रकारच्या घटना घडतात. माझ्या या पोस्टवर मला अनेकांकडून सतत धमक्या येत आहेत. भटिंडा येथील एकाने तर मला उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली.”

“मी अशाप्रकारच्या धमक्यांना अजिबात घाबरत नाही. देशाच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांविरोधात आणि दहशतवाद्यांविरोधात मी बोलते आणि नेहमीच बोलत राहीन. अनेक निष्पाप जवानांची हत्या करणारे नक्षलवादी असो, तुकडे तुकडे गँग असो किंवा आठव्या दशकातील पंजाबमधील गुरुंच्या पवित्र भूमीचे तुकडे करून खलिस्तान बनवण्याचे स्वप्न पाहणारे परदेशात बसलेले दहशतवादी असोत.”

“लोकशाही ही आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, पण अखंडता, एकात्मता आणि नागरिकांच्या मुलभूत हक्कांचे आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे रक्षण करण्याचा मूलभूत अधिकार आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला आहे. मी कधीही कोणत्याही जात, धर्म किंवा ठराविक गटाबद्दल अपमानास्पद किंवा द्वेषपूर्ण काहीही बोलली नाही.” असे कंगनाने सांगितले

यापुढे कंगना म्हणाली, “मी काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधीजी यांना आठवण करून देऊ इच्छिते की, तुम्ही देखील एक महिला आहात. तुमची सासू इंदिरा गांधीजी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत या दहशतवाद्यांविरुद्ध जोरदार लढा दिला. त्यामुळे कृपया तुमच्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना अशा दहशतवादी, विघटनकारी आणि देशविरोधी व्यक्तींकडून येणाऱ्या धमक्यांविरोधात त्वरित कारवाई करण्याचे निर्देश द्यावे.”

“मी धमकी देणाऱ्यांच्या विरोधात पोलीस तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे मला आशा आहे की पंजाब सरकार यावर लवकरच कारवाई करेल. माझा देश माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्यासाठी मला बलिदान द्यावे लागले तरी मला मान्य आहे. मी घाबरत नाही आणि कधीही घाबरणार नाही. देशाच्या हितासाठी देशद्रोह्यांच्या विरोधात उघडपणे बोलत राहीन.”

“पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यासाठी काही लोक माझ्या शब्दांचा विपर्यास करुन त्याचा वापर करत आहेत. जर मला भविष्यात काही झाले तर त्याला केवळ द्वेषाचे आणि भाषणबाजीचे राजकारण करणारेच जबाबदार असतील. त्यामुळे निवडणूक जिंकण्याच्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी कोणाबद्दलही द्वेष पसरवू नये, अशी नम्र विनंती. जय हिंद, जय भारत” असे कंगना म्हणाली.

हेही वाचा : शीखांसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावरून अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ

दरम्यान, शीखांसदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावरून कंगना रणौतच्या अडचणीत वाढ झालीय. आम आदमी पक्षाचे आमदार आणि दिल्ली विधानसभेच्या शांतता आणि सद्भावना समितीचे अध्यक्ष राघव चड्डा यांनी कंगनाला समन्स पाठवलं आहे. त्यामुळे या प्रकरणात कंगनाला ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता समितीसमोर हजर राहावे लागणार आहे. कंगनावर शिख समुदायाविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे.