बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या विरोधात कंगना रणौत नेहमीच आवज उठवताना दिसली आहे. ती नेहमीच बॉलिवूडच्या स्टार किड्सवर निशाणा साधताना दिसते. बॉलिवूड स्टार किड्समुळे बाहेरुन आलेल्या कलाकारांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं असं कंगना नेहमीच म्हणताना दिसते. आता पुन्हा एकदा तिने बॉलिवूड स्टार किड्सवर निशाणा साधताना त्यांची तुलना उकडलेल्या अंड्यांशी केली आहे. बॉलिवूड कलाकारांचं प्रेक्षकांशी काहीच कनेक्शन नसल्यानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बॉलिवूडपेक्षा उत्तम काम करताना दिसत आहे असं तिनं म्हटलंय.

करोनानंतर तेलुगू आणि कन्नड चित्रपटसृष्टीच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकलं आहे. ‘पुष्पा’, ‘RRR’ ‘केजीएफ चॅप्टर २’ या दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. पुष्पा चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं तर तब्बल १०० कोटींचा गल्ला जमवला होता. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी विरुद्ध बॉलिवूड असा वादही पाहायला मिळत आहे. पण बॉलिवूड चित्रपटांच्या तुलनेत दाक्षिणात्य चित्रपटांना जास्त यश का मिळत आहे. यावर आता कंगना रणौतनं भाष्य केलं आहे.

आणखी वाचा- पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे महेश बाबू ट्रोल, युजर्स म्हणाले; “बॉलिवूडला परवडणार नाही पण…”

कंगना रणौतच्या मते प्रेक्षक स्टार किड्सना पसंत करत नाहीत. ज्यांना अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अगदी सहजरित्या घेतलं जातं. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीची अशी अवस्था झाली आहे. ‘एबीपी लाइव्ह’ बोलताना कंगना म्हणाली, “ज्याप्रकारे माझं माझ्या प्रेक्षकांशी ज्या प्रकारे बॉन्डिंग आहे ते खूप खास आहे. इतर वेळी काय होतं की, स्टार किड्स शिक्षण घेण्यासाठी परदेशात जातात. इंग्रजीमध्ये बोलतात. फक्त हॉलिवूड चित्रपट पाहतात. वेगळ्याच प्रकारे बोलतात. असं असेल तर ते प्रेक्षकांशी कसे जोडले जाणार? ते दिसतातही खूपच विचित्र. सगळे उकडलेल्या अंड्यांसारखे दिसतात. त्यांचा संपूर्ण लूकच बदलला आहे. त्यामुळे लोक त्यांच्याशी कनेक्टच करू शकत नाहीत. मी कोणाला ट्रोल करत नाहीये पण ही सत्य परिस्थिती आहे.”

आणखी वाचा- इम्रान खान घेणार पत्नी अवंतिका मलिकपासून घटस्फोट? चर्चांना उधाण

दरम्यान काही दिवसांपूर्वी कंगनानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचं कौतुक केलं होतं. एवढंच नाही तर तिने अभिनेता महेश बाबूच्या वक्तव्यावरही भाष्य केलं होतं. ती म्हणाली, “हे जे त्याने म्हटलंय ते खरं आहे. मी याच्याशी सहमत आहे. मला माहीत आहे की त्याला बऱ्याच ऑफरही मिळत असतील. त्याच्या पिढीतील अभिनेत्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला देशात नंबर वन बनवलं आहे. त्यामुळे असे कलाकार बॉलिवूडला परवडणारच नाही. त्यानं त्याच्या इंडस्ट्रीसाठी आदर दाखवला आहे आणि हे कोणी नकारू शकत नाही की दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला कोणतीही गोष्ट सहज मिळालेली नाही. त्यासाठी त्यांना मागची १०-१५ वर्षं कठोर परिश्रम करावे लागले आहेत. या गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकायला हव्यात.”

कंगनाच्या कामाबद्दल बोलायचं तर कंगना रणौत लवकरच ‘धाकड’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या २० मे दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.