Kangana Ranaut talks about Chirag Paswan: बॉलीवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी अखेर चिराग पासवान यांच्याबरोबरच्या कथित नात्याच्या चर्चांवर मौन सोडले आहे. सार्वजनिक ठिकाणी दोघे एकत्र दिसल्यानंतर चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याबाबत उत्सुकता वाढली होती. मात्र, कंगना यांनी एका मुलाखतीत चिराग पासवान यांच्याबरोबर फक्त मैत्री असल्याचं स्पष्ट केलंय. दोघांनी १५ वर्षांपूर्वी एकत्र काम केलं होतं, तेव्हापासून त्यांची ओळख आहे. आता दोघेही राजकारणात सक्रिय असले तरी, त्यांच्यातील मैत्रीचं नातं कायम आहे. या स्पष्टीकरणामुळे सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
‘ANI’ ला दिलेल्या एका मुलाखतीत कंगना चिराग पासवान यांच्याबरोबरच्या आपल्या मैत्रीबद्दल मोकळेपणाने बोलल्या. तसेत दोघांमध्ये रोमँटिक नातं असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या. कंगना म्हणाल्या, “नाही, नाही, चिराग फक्त माझे मित्र आहेत. मी त्यांच्याकडे फक्त एक मित्र म्हणून पाहते. प्रामाणिकपणे सांगतेय, आमचं अफेअर सुरू नाहीये. आम्ही एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखतो. त्यांनी १० वर्षांपूर्वी माझ्याबरोबर चित्रपट केला होता. जर आमचं अफेअर असतं, तर आम्हाला आतापर्यंत मुलं असती.” इतक्या वर्षांनंतरही त्यांचं मैत्रीचं नातं पूर्वीसारखंच टिकून आहे, असं कंगना रणौत यांनी स्पष्ट केलं.
त्यांच्याबरोबर असताना छान वाटतं – कंगना रणौत
“जर मला त्यांच्याबरोबर रोमान्स करायचा असता, तर तो कधीच झाला असता. पण तसं काहीही नाहीये. आमचं फक्त एक मैत्रीपूर्ण नातं आहे. ते देखील चित्रपटसृष्टीतून आले आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबर असताना मला खूप छान वाटतं,” असं कंगना रणौत म्हणाल्या.
कंगना रणौत व चिराग पासवान यांचा चित्रपट
कंगना आणि चिराग पासवान यांनी २०११ मध्ये ‘मिले ना मिले हम’ या रोमँटिक ड्रामा चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन तन्वीर खान यांनी केलं होतं. या चित्रपटातून चिराग यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं आणि कंगना रणौत मुख्य भूमिकेत होत्या. यात नीरू बाजवा आणि सागरिका घाटगे यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या होत्या.
आता हे दोघेही राजकारणात आले असून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असली, तरी त्यांच्या त्या चित्रपटामुळे ते जेव्हा जेव्हा एकत्र दिसतात, तेव्हा लोकांचे लक्ष वेधले जाते. दोघांनी एकत्र यावं किंवा या दोघांमध्ये मैत्रीच्या पलीकडे काहीतरी नक्कीच आहे, अशा चर्चाही होऊ लागतात. पण चर्चांमध्ये काहीच तथ्य नसून दोघांमध्ये फक्त आणि फक्त मैत्री असल्याचं कंगना रणौत यांनी स्पष्ट केलं आहे.
कंगना रणौत यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास कंगना अलीकडेच ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात दिसली होती, ज्याचे दिग्दर्शनही तिनेच केलं होतं. या चित्रपटात तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती.
