नुकताच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा देशातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. कलाकारांना कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर कंगनाने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या खासगी आयुष्यावर वक्तव्य केले. पुढच्या पाच वर्षांमध्ये कंगना लग्न करणार असून तिला मुले असतील असे ती म्हणाली आहे.

पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर कंगनाने ‘टाइम्स नाऊ’ला मुलाखत दिली. त्यावेळी तिला तू पाच वर्षांनंतर स्वत:ला कुठे पाहतेस असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत कंगना म्हणाली, ‘मला निश्चितपणे लग्न करायचे आहे आणि मला मुले असतील. पाच वर्षांनंतर मी स्वत:ला एक आई आणि पत्नी म्हणून पाहते.’
आणखी वाचा : ‘पतीमुळेच हिचे करिअर उद्धवस्त झाले’, तारक मेहतामधील दयाबेनच्या पतीवर संतापले नेटकरी

पुढे कंगनाला तिच्या लाइफ पार्टनर विषयी विचारण्यात आले होते. ‘तुम्हाला याबाबत लवकरच माहिती मिळेल’ असे उत्तर कंगनाने दिले आहे. त्यानंतर कंगनाला तू प्रेमात आनंदी आहेस का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने हो मी आनंदी आहे असे उत्तर दिले.

भारतरत्न, पद्मविभूषण आणि पद्मभूषण यांच्यानंतर पद्मश्री हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. यंदा तब्बल १० जणांना पद्मभूषण पुरस्कार, १०२ व्यक्तींना पद्मश्री आणि सात जणांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कंगना रणौत, करण जोहर, एकता कपूरसोबत गायक अदनान सामीला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या सर्व कलाकारांचा पुरस्कार देऊन गौरव केला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते.