अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. देशातील घडामोडींवर आणि सध्याच्या करोनाच्या स्थितीवर ती बेधडकपणे मत मांडताना दिसते. यावरून कंगनाला अनेकदा ट्रोलही व्हावं लागतं. भारतात आलेल्या करोनाच्या वादळाची चर्चा सध्या जागतिक पातळीवर होतेय. मात्र इतर देश भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कंगनाने केला आहे.

काही दिवसांपूर्वीच कंगनाने एक ट्विट करत अमेरिकेतील माध्यम्यांवर निशाणा साधला होता. अमेरिकेत जुन्या गॅस लीकच्या घटनेचे आणि मृतदेहांचे फोटो छापून महामारीच्या काळात लोकांमध्ये भीती निर्माण केली जात असल्याचा आरोप तिने अमेरिकेवर केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आता कंगनाने एक व्हिडीओ शेअर भारताबद्दल अपप्रचार करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

या व्हिडीओत कंगना तिच्या घरात बसलेली दिसतेय. या व्हिडीओतून तिने इतर देशांबद्दल संताप व्यक्त केलाय. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ती म्हणाली, ” कृपा करून पहा, परदेशात जाऊन भारतीयांची दयनीय स्थिती दाखवणाऱ्यांसाठी ही चेतावनी आहे. आता तुमची वेळ संपली” म्हणत तिने परदेशात भारताची चुकीची प्रतिमा दाखवणाऱ्यांवर निशाणा साधलाय. या व्हिडीओत तिने परदेशी मासिकांमध्ये भारतातील अंत्यसंस्कारावेळी जळणाऱ्या प्रेतांचे फोटो छापण्यावरूनही नाराजी व्यक्त केली.

“भारतावर जेव्हा केव्हा एखादं संकट येत तेव्हा इतर देश एकत्र येऊन जणू मोहिम सुरू करतात. भारताला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येकवेळी आपल्याला अशी वागणूक दिली जाते जणू तुम्ही आताच माकडाचे माणूस झाला आहात. आपल्याला प्रत्येक वेळी गोष्टी कश्या हाताळण्याची गरज आहे याच्या सूचना दिल्या जातात.” पुढे ती म्हणाली की “जेव्हा अमेरिकेत किंवा इटलीत करोनाची पहिली मोठी लाट आली तेव्हा त्यांच्या नेत्यांवर कुणी टीका केली नाही. भारताला मात्र प्रत्येक वेळी इतर देश सल्ले देतात. तुम्ही कोण आहात सांगणारे? ” असं म्हणत कंगनाने संताप व्यक्त केला.

वाचा: प्रसुतीच्या ७ दिवस आधी अभिनेत्रीला करोनाची लागण, “तो काळ माझ्यासाठी..”

कंगनाने नुकताच एक व्हिडीओ शेअर करत लसीकरण करून घेण्याचं आवाहन केलं आहे. यात तिने लोकांना लसी संबंधित अफवांना बळी पडू नका असं सांगितलं आहे.