अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनी दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या समर्थनार्थ वक्तव्य केलं आहे. गेल्या महिन्यात चेन्नईमध्ये झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या २०२६च्या कार्यक्रमातील उपस्थितीमुळे त्रिशा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
त्रिशाने १५ ऑगस्ट रोजी फोर्ट सेंट जॉर्ज येथे आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी ती तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचे आई-वडील एस. ए. चंद्रशेखर आणि शोभा चंद्रशेखर यांच्या शेजारी बसल्याने पुन्हा चर्चेत आली आणि सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले.
कंगना रणौत काय म्हणाल्या?
पीटीआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या एका नव्या व्हिडीओमध्ये कंगना रणौत यांनी त्रिशा कृष्णनच्या समर्थनार्थ भाष्य केलं. कुल्लू येथे जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राहिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महिलांचं चारित्र्य नेहमीच त्यांच्या विरोधात वापरलं जातं आणि त्यातून त्यांना बदनाम करून खाली खेचण्याचा प्रयत्न केला जातो, असं कंगना म्हणाल्या. महिलांशी समाज कसा वागतो, याचा विचार करण्याची आणि आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
कंगना म्हणाल्या, “हे केवळ भारतापुरतं मर्यादित नाही, हे जगभरात पाहायला मिळतं. काम करणाऱ्या महिला, यशस्वी महिला, अभिनेत्री, राजकारणी तसेच सत्ता आणि अधिकाराच्या पदावर असलेल्या महिलांचं चारित्र्य अनेकांच्या चर्चचा विषय असतो, जेणेकरून त्यांना खाली खेचता येईल.”
त्रिशा यांचं थेट नाव न घेता कंगना पुढे म्हणाल्या, “तामिळनाडूमध्ये काय घडलं, हे तुम्ही पाहिलं आहे. एक अतिशय प्रतिष्ठित कलाकार आणि अभिनेत्री एका अशा प्रकरणात अडकले, ज्यामध्ये दोन्हीकडून परस्पर संबंध होते. मात्र, जेव्हा गैरवर्तन आणि चारित्र्यहननाचा प्रश्न येतो, तेव्हा नेहमीच महिलेलाच लक्ष्य केलं जातं.”
VIDEO | BJP MP Kangana Ranaut (@KanganaTeam) says, "We all know it, it is not only limited to India, it is there in the entire world, be it any woman, whether she is a working woman, successful woman, leader, is at a powerful position, always her character is talked to demean… pic.twitter.com/UJ65XQsnhv
— Press Trust of India (@PTI_News) September 7, 2026
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार गेल्या महिन्यात (DMK)चे नेते उदयनिधी स्टॅलिन एका सभेत भाषण करत असताना वाद निर्माण झाला. कावेरी नदीच्या पाणीवाटपाच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये हा वादाचा मुद्दा राहिला आहे. सभेत उपस्थित असलेल्या जमावाने त्रिशा यांचं नाव घेऊन घोषणा दिल्या. त्यावेळी उदयनिधी यांनी त्रिशा यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि अश्लील टिप्पणी केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता उदयनिधी यांना चेन्नईतील त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना तंजावर येथे नेण्यात आलं, ज्या ठिकाणी त्यांनी वादग्रस्त टिप्पणी केली होती. यानंतर DMKने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आणि मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर राज्याचे माजी मंत्री असलेल्या उदयनिधी यांची सुटका करण्यात आली.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून विजय यांनी १०० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. मात्र, त्रिशाबरोबरच्या त्यांच्या कथित संबंधांबाबतच्या चर्चांना अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही. विजय यांच्या पत्नी संगीता सोर्णलिंगम यांनी विवाहबाह्य संबंधांचं कारण देत घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर या चर्चांना आणखी उधाण आलं. त्यातच मे २०२६ मध्ये विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात त्रिशा भावुक झालेली दिसल्याने त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना आणखी उधाण आलं.
