अभिनेता आणि कॉमेडियन वीर दास त्याच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लोक वीर दासवर देशाचा अपमान केल्याचा आरोप करत आहेत. वीर दास सध्या अमेरिकेत आहे. अमेरिकेत त्याच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. एवढचं काय तर सोशल मीडियावर अनेकांनी त्याने भारताचा अपमान केल्याचे म्हटले आहे. यावर आता बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतने वीर दासला ट्रोल केले आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत वीर दासला ट्रोल केले आहे. एवढचं काय तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे असे ती म्हणाली आहे. “जेव्हा तुम्ही सगळ्या भारतीय पुरुषांना गँग रेपिस्ट म्हणून बोलतात तेव्हा जगभरातील लोकांना भारतीयांविरुद्ध वर्णद्वेष आणि गुंडगिरी करण्यास प्रोत्साहीत करत आहात…. बंगालमध्ये झालेल्या दुष्काळानंतर चर्चिल म्हणाले, ‘हे भारतीय सशांसारखे आहेत आणि ते असेच मरणार आहेत…’ भारतात भुकेमुळे होणाऱ्या लाखो लोकांच्या मृत्युसाठी त्यांनी भारतीयांच्या लैंगिक इच्छा/प्रजनन क्षमता दोषी असल्याचे म्हटले होते. अशा प्रकारे एका विशिष्ट जातीला लक्ष्य करणे हे सौम्य दहशतवाद आहे. वीर दास विरोधात कठोर करवाई झालीच पाहिजे”, असे कंगना म्हणाली आहे.

अलीकडेच वीर दासने त्याच्या यूट्यूब चॅनलवर ‘आय कम फ्रॉम टू इंडियाज’ हा व्हिडिओ अपलोड केला आहे. वॉशिंग्टन डीसी मधील जॉन एफ केनेडी सेंटरमध्ये त्याच्या अलीकडील सादरीकरणाचा हा व्हिडिओ होता. सहा मिनिटांच्या व्हिडिओमध्ये, दासने देशाच्या कथित दुहेरी चारित्र्याबद्दल भाष्य केल्याचे आणि कोविड-१९ महामारी, बलात्काराच्या घटना आणि विनोदी कलाकारांवरील कारवाई ते शेतकरी निषेध या मुद्द्यांचा उल्लेख केला. त्याची बोलण्याची शैली लोकांना आवडली असली तरी आता त्याला विरोध केला जात आहे.

वीर दासच्या या संपूर्ण व्हिडिओतली एक छोटी क्लिप ट्विटरवर शेअर प्रचंड व्हारल झाली आहे. ही क्लिप पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. मी अशा भारतातून आलो आहे, जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री त्यांच्यावर बलात्कार होतो. मी अशा भारतातून आलो आहे जिथे हवा गुणवत्ता निर्देशांक ९००० आहे तरीही आम्ही आमच्या छतावर झोपतो आणि रात्री तारे पाहतो. मी अशा भारतातून आलो आहे जिथे आम्हाला शाकाहारी असण्याचा अभिमान वाटतो आणि तरीही आम्ही भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकर्‍यांवर धावून जातो,” असे वीर त्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत बोलत आहे.