kanwaljeet singh On Air India : १२ जून रोजी अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. २६० हून अधिक लोकांचा त्या अपघातात मृत्यू झाला. या अपघाताने सर्वांनाच धक्का बसला.
अहमदाबाद येथील दुर्दैवी विमान अपघाताने एअर इंडिया विमान कंपनीबद्दल प्रत्येकाच्या मनात भीती आणि दहशत निर्माण केली आहे.
अपघातानंतर एअर इंडिया कंपनीलादेखील लोकांनी लक्ष्य केले. अनेकांनी कंपनीवर टीका केली; तर काहींनी पुढच्या वेळी विमानाने प्रवास करण्यापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडीओ बनवून त्याबद्दलची माहिती शेअर केली. आता टीव्ही आणि चित्रपटांमधून काम करणाऱ्या अभिनेता कंवलजीत सिंह यांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये कंवलजीत सिंह यांनी एअर इंडियाच्या विमानाने केलेल्या त्यांच्या पुढील प्रवासाची माहिती लोकांबरोबर शेअर केली आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी असे काही सांगितले की, जे आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता या व्हिडीओवर वापरकर्तेही त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
कंवलजीत सिंह यांनी व्हिडीओ केला शेअर
‘मिसेस’सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेते कंवलजीत सिंह यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते लाउंजमध्ये बसून काहीतरी खाताना दिसत आहेत. कंवलजीत सिंह या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत की, मी कोलंबोला जात आहे. पण त्यापूर्वी मी इच्छापत्र बनवलं आहे. कोलंबोमध्ये भेटूया. मी एअर इंडियाने प्रवास करीत आहे.
आता त्यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर काही वापरकर्ते त्यावर प्रतिक्रिया देतानाही दिसत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “सर, तुम्हाला वकिलाची गरज आहे का?” दुसऱ्याने कमेंट केली, “एअर इंडियाने भारताची हवा टाइट केली आहे.’ एका युजरने लिहिलेय, “सुरक्षित प्रवास करा. काळजी घ्या.”
अभिनेत्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ते शेवटचे ‘मिसेस’ चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात त्यांनी अश्विनची भूमिका साकारली होती. तसेच कंवलजीत यांना अर्जुन कपूरच्या ‘मेरे हसबंड की बीवी’ या चित्रपटात पाहिलं गेलं. १९८५ पासून ते मालिकांमध्येही काम करीत आहेत.