गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या विशिष्ट अटीमुळे चर्चेत असलेल्या ‘कप बशी’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच समाजमाध्यमांवर प्रदर्शित झाला आहे. आई, मुलगा आणि होणारी सून यांच्या नात्याची गोष्ट या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. १९ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेता ऋषी मनोहर आणि अभिनेत्री पूजा सावंत ही नवी जोडी हे चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे.
सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली असून कल्पक सदानंद जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर बिग ब्रेन प्रॉडक्शन्सच्या नीलेश रामगोपाल राठी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची पटकथा, संवाद चेतन सैंदाणे यांनी लिहिले असून दिग्दर्शन वैभव रामकृष्ण चिंचाळकर यांचे आहे. मराठी चित्रपटसृष्टीला पहिल्यांदाच सुप्रसिद्ध
ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. गुरु ठाकूर यांनी गीतलेखन, बाळू दहिफळे यांनी कॅमेरामन तर संकलक म्हणून आशिष म्हात्रे यांनी काम पाहिले आहे . राष्ट्रीय पुरस्कार विजेते मंदार कमलापूरकर यांनी ध्वनी संयोजक तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्रीकांत देसाई यांनी लूक डिझायनर म्हणून काम पाहिले आहे. अभिनेत्री निर्मिती सावंत, पूजा सावंत, नवोदित चेहरा, ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे, आनंद काळे, चिन्मय शिंत्रे, उमा सरदेशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
लग्न जमण्यामध्ये पत्रिका जुळणं महत्त्वाचं मानलं जात. पण आताच्या आधुनिक काळात उच्च शिक्षित मुलगी जी स्वतः रेडिओ जॉकी असून होणाऱ्या नवऱ्याऐवजी त्याच्या आईशी पत्रिका जुळण्याची अट घालते. या चमत्कारिक अटीमुळे काय काय धमाल किस्से घडतात, याची मनोरंजक गोष्ट “कप बशी ” या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
