Kapil Honrao Shares His Experience Working With Remo D’Souza : कपिल होनराव मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधून तो घराघरात पोहोचला. यामध्ये त्यानं मल्हार शिर्के पाटील ही भूमिका साकारलेली. सध्या कपिल चर्चेत आहे ते अभिनेता रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या आगामी चित्रपटामुळे.

‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाचा टीझर अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. आता लवकरच सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. रितेशच्या या चित्रपटात अनेक लोकप्रिय कलाकार आहेत. यामध्ये बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेकांचा समावेश आहे. यापैकीच एक म्हणजे अभिनेता कपिल होनराव.

कपिल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि त्याच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी तो यामार्फत त्याच्या चाहत्यांसह शेअर करत असतो. अशातच आता त्यानं एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यानं रितेश व बॉलीवूडमधील लोकप्रिय नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोझा यांच्याबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. २ एप्रिल रोजी रेमोचा वाढदिवस होता. त्यानिमित्तानं कपिलनं त्याच्याबरोबरचे फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कपिलनं त्याच्याबरोबर ‘राजा शिवाजी’ चित्रपटासाठी काम करतानाचा अनुभव सांगितला आहे.

Award Banner

कपिलनं सांगितला रेमोबरोबर काम करण्याचा अनुभव

कपिल या पोस्टमधून रेमोबद्दल म्हणाला, “खरं सांगू तर तुमच्याबरोबर काम करणं, रिहर्सल करणं माझ्यासाठी जणू स्वप्नवत आहे. रेमो सरांबरोबर चित्रपटात काम करणं, त्यांच्याबरोबर बसून गप्पा मारणं माझ्यासाठी हा अनुभव खरंच अविस्मर्णीय आहे. शूटिंगदरम्यान त्यांनी प्रत्येक गोष्ट इतक्या उत्कृष्टपणे आणि शांतपणे हाताळली की त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं. त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्याप्रती असलेलं समर्पण हे खरंच कमाल आहे. या संधीसाठी धन्यवाद सर. हा क्षण माझ्यासाठी नेहमीच खूप खास असेल.”

दरम्यान, कपिल होनरावनं यावेळी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या सेटवरचे रितेश आणि रेमो यांच्याबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. याचसह त्यानं रेमोबरोबरचे डान्स रिहर्सल करतानाचे फोटोही शेअर केले आहेत. कपिलनं यापूर्वीसुद्धा ‘राजा शिवाजी’ चित्रपटासंदर्भात काही पोस्ट शेअर केल्या होत्या. या चित्रपटात तो कोणत्या भूमिकेतून झळकणार आहे याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. त्यामुळे त्याला ऐतिहासिक भूमिकेत पाहणं रंजक ठरेल.