‘कापूसकोंडा’ या चित्रपटानिमित्ताने सचिन पिळगावकर, मधुराणी प्रभुलकर, अक्षता पाडगांवकर, दिग्दर्शक सचिन मोहिते आणि निर्माते अनिरुद्ध अंधोरीकर यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट देत या चित्रपटाच्या निर्मितीमागच्या गोष्टी, सेटवरचे किस्से मनमोकळेपणाने सांगितले.
अशी ही जमवाजमवी…
‘कापूसकोंडा’ चित्रपटाची कथा २०१६ मध्ये लिहिली होती. या चित्रपटाचे निर्माते अनिरुद्ध अंधोरीकर यांच्या ओळखीतल्या लातूरमधल्या एका व्यक्तीच्या बाबतीत घडलेली ही घटना होती. मला जेव्हा हा किस्सा ऐकवला गेला, तेव्हा ते मला गमतीशीर वाटलं आणि त्या व्यक्तीला भेटायला पाहिजे, असं वाटलं. त्यांना शोधून, त्यांच्याकडून सगळं समजून घेतल्यावर मग मी त्यावर कथा लिहायला घेतली. चित्रपटाची तयारी सुरू होणार, तेव्हा कोविडमुळे टाळेबंदी सुरू झाली. त्यामुळे त्यानंतर पुन्हा सगळी जुळवाजुळव करून मग कथालेखन पूर्ण केलं आणि ती लिहीत असतानाच सचिन पिळगावकर यांना डोक्यात ठेवूनच चित्रपटातली मुख्य व्यक्तिरेखा मी लिहित गेलो’, अशी आठवण दिग्दर्शक सचिन मोहिते यांनी सांगितलं. या चित्रपटासाठी सचिन पिळगावकर यांचा होकार कसा मिळाला, याची आठवणही त्यांनी सांगितली. ‘मी त्यांना ओळखत नव्हतो, पण चित्रपटाची कथा ऐकवायची आहे यासाठी मी फोन करून त्यांची वेळ घेतली. मला दिलेल्या वेळेपेक्षा १५ मिनिटं उशिरा त्यांच्याकडे पोहोचलो होतो. ‘आता माझ्याकडे १५ मिनिटं आहेत, तू तुझी कथा ऐकव’, असं सचिनजींनी सांगितलं. आणि पुढे अडीच तास मी त्यांना कथा ऐकवत होतो. ते पूर्ण झाल्यावर ते मला एवढंच म्हणाले, ‘सचिन हा चित्रपट झालाच पाहिजे. तू जशी कथा मला ऐकवली आहेस, तसाच हा चित्रपट झाला तर मला सगळं मिळालं’. त्यांनी दाखवलेल्या या विश्वासाने आमचा या चित्रपटाचा प्रवास सुरू झाला आणि आज आम्ही चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालो आहोत, असंही मोहिते यांनी सांगितलं.
उत्तम चित्रपटासाठी निर्मात्याची साथही महत्त्वाची…
या चित्रपटाची कथा ऐकत असतानाच मला लेखक-दिग्दर्शक म्हणून त्याची किती तयारी आहे, चित्रपटाच्या गोष्टीबद्दल स्पष्टता किती आहे हे मला माझ्या आजवरच्या थोड्याफार अनुभवातून लक्षात आलं होतं. आणि म्हणून मी त्याला म्हटलं, तू जसं ऐकवलं आहेस तसा चित्रपट घडला पाहिजे तर त्यात मजा आहे’, असं सांगत सचिन पिळगावकर यांनी अभिनेता म्हणून ते या चित्रपटाशी कसे जोडले गेले याची आठवण सांगितली. ‘कापूसकोंडा’सारखा चित्रपट करायचा तर लेखक-दिग्दर्शकाला निर्मात्याचीही भक्कम साथ मिळाली पाहिजे आणि इथे अनिरुद्ध अंधोरीकर यांनी खूप खंबीरपणे या सगळ्या आमच्या टीममागे उभं राहून चित्रीकरण उत्तम होण्यासाठी प्रयत्न केले. चित्रपट करताना अनेक अडथळे येतात. कधी कधी नियोजित नसलेल्या गोष्टीही घडतात, त्यातून बाहेर पडूनही आपण चांगला चित्रपट बनवू शकतो, हे या लोकांनी सिद्ध केलं आणि ज्याचं मला कौतुक आहे, असं पिळगावकर यांनी सांगितलं.
बावीस वर्षांपूर्वीचं नवखेपण आणि आज एकत्र भूमिका…
‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात मधुराणी प्रभुलकरने काम केलं होतं. ‘बावीस वर्षांपूर्वी मी त्या चित्रपटाचा भाग झाले, तेव्हा या क्षेत्रात येण्यासाठी धडपडणारी एक नवखी मुलगी होते. त्यामुळे २० दिवसांच्या चित्रीकरणाचा काळ हा बराचसा बरोबरच्या कलाकारांचे निरीक्षण करण्यातच हरवून गेला होता. या चित्रपटासाठी दिग्दर्शक सचिन मोहितेंनी विचारणा केली आणि सचिन पिळगावकर यांच्याबरोबर काम करायचं आहे, असं सांगितलं तेव्हा मी क्षणाचाही विचार न करता होकार दिला’, असे मधुराणीने सांगितलं. ‘लातूरहूनही लांब आंधोरीसारख्या गावात या चित्रपटाचं चित्रीकरण झालं आहे. मुंबईत जसं आपल्याला हवं तसं सगळ्या गोष्टी ऐनवेळी मिळतात, मात्र तिथे आडमार्गी असलेलं गाव, चित्रपटात मोठमोठ्या कलाकारांबरोबर मुख्य भूमिकेत असलेला एक कुत्रा आणि त्याच्याशी संवाद साधत इतर कलाकारांकडूनही चोख काम काढून घेणं, वेळेच्या मर्यादा, खर्चाच्या मर्यादा हे सगळं सांभाळून चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि सगळ्याच टीमने हे जमवून आणलं याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे’ अशी भावनाही मधुराणीने व्यक्त केली.
‘नवरा माझा नवसाचा’ बघणं हा दिनचर्येचा भाग…
‘कापूसकोंडा’ या चित्रपटात सचिन पिळगावकर आणि मधुराणी प्रभुलकर यांनी साकारलेल्या दाम्पत्याच्या लहान मुलीची भूमिका अभिनेत्री अक्षता पाडगावकर हिने केली आहे. या चित्रपटानिमित्ताने दिग्गज कलावंतांबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद अक्षताने व्यक्त केला. ‘लहानपणी शाळेतून घरी आल्यावर कपडेही न बदलता, पहिल्यांदा ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपट पाहणं हा माझ्या दिनचर्येचा भाग झाला होता. तसंच, मधुराणी प्रभुलकर यांच्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे तर घरात सगळेच चाहते आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्रात आल्यानंतर अशा दिग्गज कलाकारांबरोबर काम करणं हे आपलं स्वप्न असतं, ते या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झालं’ अशी भावना अक्षताने व्यक्त केली.
सगळा विश्वासाचा खेळ…
आमच्या चित्रपटात सगळा खेळ हा विश्वासाचा आहे असं घोषवाक्य आहे आणि त्याचपद्धतीचे अनुभव आम्हाला हे चित्रपट करताना आले, असं सचिन मोहिते यांनी सांगितलं. ‘दिग्दर्शक म्हणून जिथे ठरवलं आहे तिथेच गोष्टी झाल्या पाहिजेत हा माझा हट्ट असतो. आणि आम्ही लातूरमध्ये चित्रीकरण करत असताना तिथे इतका पाऊस पडला की आम्ही शेतात एका व्यक्तिरेखेचं घर उभारलं होतं ते तीन वेळा वाहून गेलं. आणि आम्हाला मुंबईत परतावं लागलं. चौथ्यांदा आम्ही पुन्हा तिथेच सेट लावला आणि त्या रात्रीही माझे सगळे कला दिग्दर्शक, छायाचित्रकार आम्ही एकत्र बसलो होतो आणि उद्याही पावसाचा अंदाज आहे, असं त्यांनी सांगितलं. तेव्हा मात्र मी उद्या करणारच चित्रीकरण हा निर्धार केला आणि ते झालं. तशीच आणखी एक घटना घडली. आम्ही पंढरपूरच्या द्वाराशी चित्रीकरण केलं होतं, जे आजवर कोणी केलेलं नाही. आणि चित्रपटाचा शेवट तिथे चित्रित होत होता, सचिन पिळगावकरांवर तो चित्रित होत होता. मुंबईतून स्टेडीकॅम मागवून मी तो घेऊन सचिनजींच्या अवतीभवती फिरत होतो. त्याच वेळी अचानक एक म्हातारी आजी फ्रेममध्ये आल्या. त्यांनी तिच्या साडीच्या खोच्यातून एक पाकीट काढलं आणि शंभर रुपयाची नोट घेऊन सचिनजींच्या हातात ठेवली. आणि छान करतो आहेस म्हणून ती निघूनही गेली. ती कुठे गेली हे शोधायचा आम्ही प्रयत्न केला, पण ती कुठेच सापडली नाही. तर असे खूप अनुभव आम्हाला या चित्रपट करताना आले’ असं दिग्दर्शक सचिन मोहिते यांनी सांगितलं.
आषाढीच्या वारीत चित्रीकरण…
या चित्रपटाचं चित्रीकरण हे बरंचसं वास्तव जागांवर झालेलं आहे. आषाढीच्या वारीत हे आम्ही चित्रीकरण केलं होतं आणि पहिल्यांदा एका प्रॉडक्शन टीमने आषाढीच्या रिंगणात हे चित्रीकरण केलं. या सगळ्या ठिकाणी इतकी गर्दी असताना, अनेकदा दोन-चार किलोमीटरपर्यंतचा चालत प्रवास, रात्री उशिरा चित्रीकरण आणि पुन्हा पहाटे चित्रीकरणाला हजर राहणं या सगळ्या गैरसोयीत काहीही तक्रार न करता सचिन पिळगावकर, मधुराणी प्रभुलकर यांनी खूप सहकार्य केले, अशी माहिती निर्माते अनिरुद्ध अंधोरीकर यांनी दिली.
‘आयत्या घरात घरोबा’ वीस लाखांत केला होता…
चित्रपट निर्मिती ही सध्या खर्चीक बाब झाली आहे, असं सांगत १९८९ मध्ये ‘आत्मविश्वास’ हा चित्रपट निर्माता म्हणून केला तेव्हा तो ११ लाख रुपयांत केला होता, अशी आठवण सचिन पिळगावकर यांनी सांगितलं. ‘लोकमान्य’ चित्रपटाच्या वेळी दिग्दर्शक ओम राऊत याने त्यातल्या एका १० ते १२ सेकंदाच्या दृश्यासाठी ब्रिटिशकालीन शहर उभं करायला वीस लाख रुपये खर्च केल्याचं सांगितलं. तेव्हा मी इतक्या किमतीत ‘आयत्या घरात घरोबा’ हा चित्रपट पूर्ण केला होता, असं त्याला सांगितलं. तेव्हा मला घाबरवू नका… असं गमतीने तो म्हणाला. इतक्या मोठया प्रमाणावर खर्च करून निर्माता जेव्हा एक चित्रपट उभा करतो, तेव्हा प्रेक्षकांचाही प्रतिसाद मिळाला पाहिजे. कारण, चित्रपटाला यश मिळालं तर तो निर्माता पुन्हा दुसऱ्या चित्रपटासाठी उभा राहील आणि ते जेव्हा होईल तेव्हा किमान ३०० घरांमध्ये चूल पेटेल, ही गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे, असं पिळगावकर यांनी सांगितलं.
