गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक-निर्माता करण जोहर त्याच्या ‘कॉफी विथ करन’ या कार्यक्रमामध्ये गुंतलेला आहे. ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सिझनचा ९ वा भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे. या कार्यक्रमाचे उरलेले काही भाग पुढे प्रदर्शित होणार आहेत. करन या कार्यक्रमाव्यतिरिक्त आणखी एका कार्यक्रमाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. कलर्स टिव्ही या वाहिनीवरील ‘झलक दिखला जा’ या डान्सिंग रियालिटी शोच्या नव्या सिझनमध्ये करण जोहर परीक्षकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याने याआधी झलक दिखला जा, इंडियाज गॉट टॅलेट, दिल है हिंदुस्तानी, इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स अशा काही कार्यक्रमांमध्ये परीक्षक म्हणून काम केले आहे.

‘झलक दिखला जा’चा नवा सिझन येत्या शनिवारी ३ सप्टेंबरला प्रसारित होणार आहे. या सिझनमध्ये शिल्पा शिंदे, रुबीना दिलैक, अली असगर, अमृता खानविलकर, गश्मीर महाजनी अशा काही कलाकारांनी सहभाग घेतला आहे. तर करण जोहर, माधुरी दीक्षित आणि नोरा फतेही हे यामध्ये परीक्षक म्हणून काम करणार आहेत. यानिमित्ताने इंडियन एक्सप्रेसने करण जोहरशी संवाद साधला. तेव्हा पाच वर्षांच्या ब्रेकनंतर येणाऱ्या नव्या सिझनसाठी खूप उत्सुक असल्याचे त्याने सांगितले. “त्यांनी शोसाठी जेव्हा मला फोन केला, तेव्हा मी लगेच माझा होकार कळवला. त्यांनी फक्त हॅलो बोलायला फोन केला असावा” करण असं हसत म्हणाला.

बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी सिनेमाच्या मोठ्या पडद्यासह टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावरही काम केले आहे. गेल्या काही वर्षात करण जोहर अनेक रियालिटी शोजमध्ये झळकत आहे. इंडियन एक्सप्रेसच्या टीमने करणला टेलिव्हिजन या माध्यमाविषयी तुला काय आवडतं असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, “टेलिव्हिजन या माध्यमाचा प्रेक्षकवर्ग फार मोठा आहे. आपल्या देशातल्या प्रत्येक गावात-शहरात टिव्ही बघितला जातो. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन कार्यक्रम पाहतात ही गोष्ट किती सुंदर आहे.”

सध्याच्या बॉलिवूडविरोधी वातावरणाबाबत बोलताना करणने आपले मत व्यक्त केले. त्याच्या मते, सर्वत्र नकारात्मक वातावरण असताना तुम्हाला काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते. जर तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा असेल तर त्याच पद्धतीचे वातावरण तुमच्या सभोवती निर्माण होईल. ट्रोल्ससारख्या नकारात्मक बाबींकडे लक्ष दिल्यावर तु्म्ही देखील नकारात्मक व्हाल. याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होईल असंही करण म्हणाला.

आणखी वाचा : विराट कोहली होणार किशोर कुमार यांचा भाडेकरू, वाचा नेमकं प्रकरण आहे तरी काय?

करण जोहरचा आगामी ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. करण या चित्रपटाचा निर्माता असून अयान मुखर्जीने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. रणबीर कपूर, आलिया भट, अमिताभ बच्चनसारखे कलाकार यात काम करत असून. सध्या सगळेच या चित्रपटासाठी उत्सुक दिसत आहेत.