Kareena Kapoor’s dietician shares simple tips and remedies for better sleep : बॉलीवूड सेलिब्रिटी अनेकदा त्यांच्या डाएट, फिटनेस आणि डेली रूटीन या गोष्टींमुळे चर्चेत असतात. अनेक सेलिब्रिटींचे डायटिशियन, फिटनेस ट्रेनर असतात जे त्यांना काय खायचं, कधी खायचं, फिटनेससाठी काय करायचं या सगळ्या गोष्टी सांगत असतात. बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरसुद्धा डायटिशियनकडून सल्ला घेत असते.
करीना कपूरची डायटिशियन रुजुता दिवेकर तिच्यासह आलिया भट्टलासुद्धा याबाबत सल्ला देते. काही दिवसांपूर्वी तिने या दोन अभिनेत्रींसह फोटो शेअर केला होता. रुजुता दिवेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि यामार्फत ती अनेक व्हिडीओ शेअर करत त्यामधून विविध गोष्टी, समस्यांबद्दल सांगत त्यावर उपाय आणि सल्ले देत असते. अशातच आता तिने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामधून रात्री झोपताना त्रास होत असेल, मध्येच जाग येत असेल आणि पुन्हा झोपण्यास त्रास होत असेल तर काय करायचं याबद्दल सांगितलं आहे.
या पोस्टमधून तिने काही वस्तू दाखवल्या आहेत. ज्यामध्ये काही पदार्थ आहेत ज्यांचं सेवन केल्यानतंर झोप येण्यास मदत होईल असं तिने म्हटलं आहे. या पोस्टमधून तिने प्रत्येक पदार्थाचे महत्त्व आणि वापर कसा करायचा याबद्दल सांगितलं आहे. कॅप्शनमधून तिने याबद्दल माहिती देत म्हटलं की, “अंथरुणावर इकडे-तिकडे वळत राहता आणि झोप लागत नाही का? रात्री ३ वाजता जाग येते आणि पुन्हा झोप येणं अवघड होतं का? पायात गोळे येणे, घसा कोरडा पडणे किंवा खोकल्यामुळे रात्रभर झोप लागत नाही का?” असं म्हणत त्यावर उपाय सांगितला आहे.
रुजुता दिवेकरने सांगितले उपाय
रुजुताने यावेळी अशावेळी रात्री चार गोष्टी सोबत ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये पाण्याचा जग, खडी साखर, घी आणि राजगिऱ्याचे लाडू यांचा समावेश आहे. यामधून त्यांना याचा कसा फायदा होतो हे सांगितलं आहे. पाण्याबद्दल ती म्हणाली, “कधी कधी पुन्हा झोप येण्यासाठी फक्त थोडंसं पाणी पिणं पुरेसं असतं. जर तुम्हाला गोळे येऊन जाग आली असेल, तर थोडं पाणी पिणं आणि दिवसभर पाण्याचं प्रमाण वाढवणं हा त्यापासून बचाव करण्याचा चांगला उपाय आहे.”
तूप – “झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना थोडं तूप लावून मसाज करा. विशेषतः झोप येत नसेल तर हे नक्की करून पाहा. तसंच, नाकात आणि कानातही थोडंसं तूप लावू शकता. यामुळे झोप चांगली लागते आणि सकाळी नाक बंद होणं किंवा शिंक येणं कमी होतं.”
खडीसाखर (मिश्री) – “झोप येत नसेल तर तोंडाच्या एका बाजूला खडीसाखर ठेवा. रात्री घसा कोरडा पडणे, गुदमरल्यासारखं वाटणं किंवा खोकल्यामुळे जाग आली तर हे खूप उपयोगी ठरते. यामुळे घसा ओलसर राहतो आणि पुन्हा सहज झोप लागते.”
राजगिऱ्याचे लाडू – रात्री जाग आली आणि पुन्हा झोप येत नसेल, तर हलके, गोड आणि पौष्टिक राजगिऱ्याचे लाडू खा. हे खाल्ल्याने शरीर शांत होतं आणि पुन्हा सहज झोप लागण्यास मदत होते.
