करिना कपूर खान आणि सैफ अली खानचा मुलगा तैमुरच्या नवनवीन फोटोंसाठी सोशल मीडियावर नेटीझन्स जणू वाटच बघत असतात. तैमुरचे फोटो अवघ्या काही क्षणांतच व्हायरल होताना दिसतात. सैफ आणि करिना तैमुरसोबत सध्या स्वित्झर्लंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. त्यांच्या या ट्रिपमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये करिना आणि सैफ चाहत्यांसोबत पोझ देताना दिसतात तर चिमुकला तैमुर खेळण्यांसोबत स्ट्रोलरमध्ये बसलेला दिसतो. गोंडस तैमुरचे हे फोटो पुन्हा एकदा अनेकांचं लक्ष वेधत आहेत.
सात महिन्यांचा तैमुर पहिल्यांदाच परदेशात गेला असून, त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या नवीन फोटोंमध्ये करिना मेकअपशिवाय दिसतेय तर सैफ डॅपर लूकमध्ये दिसतोय. आई – बाबा चाहत्यांसोबत फोटो काढण्यात व्यग्र असताना चिमुकला तैमुर मात्र स्ट्रोलरमध्ये बसून खेळतोय. याआधीच्या फोटोमध्ये तैमुर आपल्या बाबांसोबत त्यांच्या मांडीवर बसलेला दिसला. तर करिना त्याच्या बाजूला बसलेली दिसली. इतर काही फोटोंमध्ये सैफ आणि त्याच्या या छोट्या मुलाच्या नवाबी अंदाजाने अनेकांच्याच हृदयाचा ठाव घेतला.
जन्मापासूनच तैमुर चर्चेचा विषय ठरला. त्याच्या नावावरील वादापासून तो पतौडी आहे की कपूर अशा सर्व चर्चा रंगल्या. या स्टार किडबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सोशल मीडियावर तैमुरचे फोटो सैफीनाचे चाहते कौतुकाने पाहतात.