गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अभिनेत्री करिना कपूर खानने तैमुर अली खान पतौडीला जन्म दिला. त्यानंतर आता पहिल्यांदा तिने एका मासिकासाठी कव्हर फोटोशूट केलंय. गरोदरपणातही तिने मासिकासाठी फोटोशूट आणि डिझायनर सब्यसाचीसाठी रँप वॉकसुद्धा केला होता. आता बऱ्याच कालावधीनंतर तिने ‘फिल्मफेअर’ मासिकासाठी कव्हर फोटोशूट केलंय. ‘ग्लॅम क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या करिनाने बरंच वजन घटवलं असून गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

‘फिल्मफेअर’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याचा फोटोसुद्धा पोस्ट करण्यात आला असून नेटिझन्सकडून भरभरून लाइक्सही मिळत आहेत. फोटोशूटनंतर दिलेल्या मुलाखतीत बेबोने बऱ्याच मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. बॉलिवूडमध्ये एअरपोर्ट लूक ही संकल्पनाच बंद केली पाहिजे असं मत तिने यावेळी व्यक्त केलं. त्यासोबतच घराणेशाहीच्या मुद्द्यावर करिनाने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ‘प्रत्येक क्षेत्रात घराणेशाही आहे असे तुम्हाला नाही का वाटत? पण, त्यावर कोणीच काही बोलत नाही. पण, चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीवर तुम्ही बरंच लिहिता. अनेक स्टार किड्सनी तर त्यांच्या सेलिब्रिटी पालकांप्रमाणे नावही कमवले नाही. मग यावर लोक का बोलत नाहीत, हेच मला कळत नाहीये,’ असं ती म्हणाली.

PHOTOS : अखेर रणवीरने दाखवला त्याचा खरा चेहरा

बेबो लवकरच ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. सोनम कपूरची बहिण रिया कपूर या चित्रपटाची निर्मिती करतेय. यामध्ये करिना कपूर खानसोबत सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.