करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाच्या म्हणजेच तैमुरच्या नावाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले होते. तैमुरच्या जन्मानंतर सोशल मिडियावर विविध चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा सैफिनाचा छोटा नवाब एका नव्या नावामुळे चर्चेत आला आहे. तैमुर नावामुळे काहील वाद निर्माण झाल्यानंतर करिना आणि सैफने बाळाचे नाव बदलले नसले तरी करिनाने बाळाला एक वेगळे टोपण नाव दिल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. करिना-सैफच्या मुलाच्या नावावरुन रंगलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाल्यानंतर करिनाने तैमुराला लाडाने बोलण्यासाठी एक खास नाव ठेवले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करिना तैमुरला ‘बेबी जॉन’ नावाने बोलविणे पसंत करते. विशेष म्हणजे तैमुर हे नाव करिनाला फारच आवडले होते. मात्र घरामध्ये ती तैमुरला बेबी जॉन नावाने बोलवत असल्यामुळे तैमुर नावाची करिनाला अॅलर्जी झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. बाळाच्या जन्मानंतर करिना आणि सैफने त्यांच्या बाळाचे नाव तैमुर ठेवले होते. सध्या कपूर कुटुंबातच नाही, तर बॉलिवूड विश्वात आणि सर्वच चाहत्यांमध्येही तैमुरविषयीच्याच चर्चा रंगताना दिसते. सैफच्या छोट्या नवाबाची पहिली झलक जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती तेव्हाही चाहत्यांनी तैमुरच्या फोटोला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, तैमुरच्या नावाची रंगलेली चर्चा विचित्र वाटल्याचे करिनाने नुकतेच एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले होते. वैयक्तिक आयुष्यातील घटनेवर लोकांच्या उमटलेल्या प्रतिक्रियेवर तिने नाराजी व्यक्त केली होती. लोकांनी तैमुरच्या नावाचा एवढा गाजावाजा का केला? हे समजण्यापलिकडचे आहे, असे करिनाने म्हटले होते. दरम्यान तिने पती सैफच्या सूरात सूर मिळवत आपल्या चिमुकल्या नावाचा अर्थ स्पष्ट केला होता. तसेच तैमुरच्या संगोपनात मी काहीच कमी पडू देणार नाही. तसेच त्याला जे करायचे आहे ते विनम्रपणे करण्याचा आणि सभोवती असणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला देईन, असेही करिनाने म्हटले होते.

यापूर्वी रंगून’ चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत असलेल्या सैफने तैमुरच्या नावाविषयी आणि त्या नावामागे असणाऱ्या इतिहासाविषयी आपल्याला सर्व काही ठाऊक असल्याचे स्पष्ट केले होते. ‘मला ठाऊक आहे की तैमुर नावाचा एक क्रूर शासक होता. तो तैमुर होता, हा तैमुर आहे. या दोन्ही नावांमध्ये साधर्म्य असू शकतं कारण त्यांची पाळेमुळे काही प्रमाणात सारखी आहेत. त्याचप्रमाणे आजच्या दृष्टीकोनातून भूतकाळात पाहणं हे काहीसं विचित्र आहे. असे म्हणत सैफने तैमुरच्या नावाविषयीच्या सर्व चर्चांना सडेतोड उत्तर दिले होते.