kareena kapoor wearing a traditional Kolhapuri chappal : बॉलीवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर खान पुन्हा एकदा तिच्या स्टाईल आणि स्टेटमेंटमुळे चर्चेत आली आहे. यावेळी तिने कोणत्याही चित्रपट किंवा रेड कार्पेट लूकने नाही, तर तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे लोकांचे लक्ष वेधले गेले आहे.

तिच्या अलीकडच्या सुट्टीतील एक फोटो शेअर करताना, करीनाने जागतिक लक्झरी ब्रँडवर टीका केली आहे आणि भारतीय पारंपरिक कारागिरीला पाठिंबा देण्याचा जोरदार संदेशही दिला आहे.

करीनाचे देसी स्टाईलमध्ये उत्तर

करीना सध्या तिच्या कुटुंबासह लंडनमध्ये सुट्टी घालवत आहे. यावेळी तिने समुद्रकिनाऱ्यावरील एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये ती आरामात बसलेली आहे आणि तिच्या पायांत चमकदार चांदीच्या कोल्हापुरी चप्पल दिसत आहेत. या पोस्टमध्ये हसणारे आणि मुक्का मारण्याच्या इमोजींबरोबर एक हृदयाची इमोजीदेखील जोडण्यात आली आहे. तिने लिहिले आहे, “माफ करा प्राडा नाही… पण माझे ओजी कोल्हापुरी”.

नुकतेच इटालियन फॅशन हाऊसने त्यांच्या मेन्स स्प्रिंग समर २०२५ कलेक्शनमध्ये एक चप्पल सादर केली, जी अगदी भारतीय कोल्हापुरी चप्पलसारखी दिसत होती. त्यानंतर सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू झाली की, आंतरराष्ट्रीय ब्रँड श्रेय न देता, भारतीय कारागिरीचा वापर करत आहेत. लोकांनी याला ‘कल्चरल अप्रोप्रिएशन’, असे म्हटले आणि पारंपरिक कारागीरांच्या आदराचा मुद्दा उपस्थित केला.

परिस्थिती बिकट होत चालली आहे हे पाहून, ब्रँडला स्पष्ट करावे लागले की, त्यांची रचना कोल्हापुरीपासून प्रेरित आहे आणि आता त्यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि कारागीरांशी चर्चा करून पुढे जाण्याचा मार्ग शोधायचा आहे. ही बैठक ११ जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे.

करीनाने जास्त काही न बोलता एक मजबूत संदेश दिला. तिने दाखवून दिले की, भारतीय कारागिरी केवळ पारंपरिकच नाही, तर फॅशनेबलदेखील आहे. करीना कपूरला फॅशन आयकॉन मानले जात असले तरी यावेळी तिने ग्लॅमरपासून दूर जाऊन भारतीय कारागिरीला प्रोत्साहन दिले. दुसरीकडे आजकाल ती सैफ अली खान आणि मुले तैमूर व जेह यांच्याबरोबर लंडनमध्ये फिरताना दिसत आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती जेवणाचा आनंद घेत आहे आणि मुलांबरोबर वेळ घालवत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.