Karishma Tanna Announces Pregnancy: टेलिव्हिजन, बॉलिवूड आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. करिश्मा तन्नाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ती आई होणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. पती वरुण बंगेराशी लग्नानंतर ४ वर्षांनी करिश्मा ही आनंदाची बातमी दिली असून वयाच्या ४२ व्या वर्षी ती आई होणार आहे. फोटोंमध्ये करिश्मा तिचा बेबी बंप अभिमानाने फ्लाँट करताना दिसत आहे.

करिश्मा तन्ना व तिचा पती वरुण बंगेरा लग्नानंतर ४ वर्षांनी आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. करिश्मा तन्नाने तिच्या इन्स्टाग्रामवर मॅटर्निटी फोटो पोस्ट करून चाहत्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. करिश्मा ४२ व्या वर्षी आई होणार आहे.

पाहा करिश्मा तन्नाची पोस्ट

“एक छोटासा चमत्कार, आमचं सर्वात मोठं गिफ्ट ऑगस्ट २०२६ मध्ये येणार आहे,” असं कॅप्शन करिश्मा तन्नाने तिच्या पोस्टला दिलं आहे. फोटोंमध्ये करिश्मा बेबी बंप फ्लाँट करतेय. काही फोटोंमध्ये छोट्या बाळाचे शूज दिसत आहेत. करिश्मा व वरुण यांनी आपल्या पाळीव श्वानांबरोबरही फोटोशूट केलं आहे.

Award Banner

करिश्मा तन्नाने ही आनंदाची बातमी दिल्यानंतर सर्वांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दिया मिर्झा, कृतिका कामरा, मनीष पॉल, दलजीत कौर, आदित्य सील, संजीदा शेख, अंशिका वर्मासह अनेकांनी कमेंट्स करून करिश्मा व वरुणवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

करिश्मा तन्ना व वरुण बंगेराचे लग्न

करिश्मा तन्ना व वरुण यांनी ५ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबईत एका खासगी समारंभात लग्न केलं. वरुण हा चित्रपटसृष्टीतील नसून तो एक यशस्वी व्यावसायिक आहे. तो ‘VB Corp’ या रिअल इस्टेट कंपनीत डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे. या दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली होती, त्यानंतर काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

करिश्मा तन्नाचे करिअर

दरम्यान, करिश्मा तन्ना दोन दशकांहून जास्त काळापासून अभिनयविश्वात सक्रिय आहे. तिने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आणि त्यानंतर ती अभिनय क्षेत्राकडे वळली. तिने एकता कपूरच्या प्रसिद्ध ‘क्युंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून अभिनयात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘कही तो मिलेंगे’, ‘बालवीर’, आणि ‘नागिन ३’ सारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या.

करिश्मा रिअॅलिटी शोची क्वीन मानली जाते. ती ‘बिग बॉस ८’ ची रनर-अप होती. तसेच तिने ‘झलक दिखला जा ९’, ‘नच बलिये ७’ मध्ये सहभाग घेतला होता. ‘फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी १०’ ची ती विजेती ठरली होती. तिने ‘ग्रँड मस्ती’ आणि ‘संजू’ सिनेमात काम केलंय. तसेच २०२३ मध्ये स्कूप नावाच्या नेटफ्लिक्स सीरिजमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती.