scorecardresearch

विवेक अग्निहोत्रींनी ‘द कश्मीर फाइल्स’च्या कमाईतील ५० टक्के दान करावी नाहीतर…; करणी सेनेचा इशारा

करणी सेनेने निर्माते, झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना हे आवाहन केले आहे.

Karni Sena demands that Vivek Agnihotri should donate 50 percent of the proceeds of The Kashmir Files

करणी सेनेने ‘द काश्मीर फाइल्स’च्या निर्मात्यांना चित्रपटाच्या कमाईतील ५० टक्के रक्कम दान करण्यास सांगितले आहे. जेणेकरून ती रक्कम विस्थापित काश्मिरी पंडितांच्या मदतीसाठी वापरता येईल. करणी सेनेने चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकाला विस्थापित काश्मिरी पंडितांच्या कल्याणासाठी ही रक्कम बाजूला ठेवण्याची विनंती केली आहे. करणी सेनेने निर्माते, झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना हे आवाहन केले आहे.

द ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, १६ मार्च रोजी चंदीगडमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाविषयी बोलताना करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरज पाल सिंह अमू यांनी याबाबत भाष्य केले आहे.  “बहुतेक राज्यांनी हा चित्रपट करमुक्त घोषित केला आहे, जेणेकरून सर्वसामान्यांनाही तो पाहता येईल. त्यामुळे या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी पुढे येऊन चित्रपटाच्या कमाईतील ५० टक्के रक्कम दान करावी. जेणेकरून ती रक्कम विस्थापित काश्मिरी पंडितांच्या कल्याणासाठी वापरता येईल. यावरून हेही स्पष्ट होईल की, निर्मात्यांनी चित्रपटात जी कथा दाखवली आहे, त्यात ते बळी पडलेल्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत,” असे करणी सेनेचे प्रमुख सूरज पाल अमू म्हणाले.

‘द कश्मीर फाइल्स’ मोफत दाखवणाऱ्यांवर भडकले विवेक अग्निहोत्री; म्हणाले, खरा राष्ट्रवाद…

“द कश्मीर फाइल्सच्या निर्मात्यांनी तसे केले नाही तर, त्यांनी हा चित्रपट फक्त व्यथा दाखवण्यासाठी बनवला आहे असे मानले जाईल. त्यांना त्यांच्या भल्याची काळजी नाही. तसे झाले नाही तर करणी सेनेचे लोक हा चित्रपट पाहणार नाहीत,” असेही सूरज पाल सिंग अमू म्हणाले.

यासंदर्भात मध्य प्रदेशचे आयएएस अधिकारी नियाज खान यांनीही अशा प्रकारची मागणी केली होती. नियाज खान यांनी आपल्या एका ट्विटमध्ये, द काश्मीर फाइल्स चित्रपटाची कमाई १५० कोटींवर पोहोचली आहे. काश्मिरी पंडितांच्या भावनांचा लोकांनी खूप आदर केला आहे. चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटातून मिळालेला पैसा काश्मिरी पंडितांच्या मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या घरावर खर्च केला तर बरे होईल, असे म्हटले होते. त्यावर उत्तर देताना दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी, नियाज खान साहेब २५ तारखेला भोपाळला येत आहेत. मला भेट द्या म्हणजे आम्ही मदतीबद्दल बोलू, असे म्हटले होते.

मात्र यावर चित्रपटाशी संबंधित कोणत्याही सदस्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच त्यांनी आतापर्यंत कोणत्याही प्रकारची देणगी जाहीर केलेली नाही. तर रविवारी या चित्रपटाने २६.२० कोटी रुपयांची कमाई केली. यासह ११ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे एकूण कलेक्शन १६७.४५ कोटींवर पोहोचले आहे. चित्रपट व्यवसायातील जाणकार लोकांचा असा विश्वास आहे की ‘द कश्मीर फाइल्स’ २०० कोटींचा आकडा गाठू शकते. असे झाले तर ‘द काश्मीर फाइल्स’ अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’लाही मागे टाकेल. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर १९५.५५ कोटींची कमाई केली. करोनाच्या संकटानंतर प्रदर्शित होऊन सर्वात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरू शकतो.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Karni sena demands that vivek agnihotri should donate 50 percent of the proceeds of the kashmir files abn

ताज्या बातम्या