कियारा अडवाणीचं काही दिवसांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबरोबर लग्न झालं. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. लग्नानंतर दोघे पुन्हा आपल्या करियरकडे वळले आहेत. सिद्धार्थ ‘योद्धा’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच तो रोहित शेट्टीच्या आगामी वेबसीरिजमध्येदेखील झळकणार आहे. तर कियारा ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकताच या चित्रपटातील एक सीन लीक झाला आहे. बॉलिवूडचा आजचा आघाडीचा अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. विशेष म्हणजे ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस करत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणातला एक सीन सध्या व्हायरल होत आहे. ज्यात कार्तिक आर्यन व कियारा सप्तपदी घेताना दिसत आहेत. कार्तिक कियाराचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट एक संगीतमय प्रेमकथा असणार आहे. यामध्ये आपल्याला वेगवेगळी गाणी आणि एक छानशी प्रेमकहाणी बघायला मिळू शकते. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सुप्रसिद्ध निर्माते साजिद नाडियाडवाला, आणि शरीन मंत्री केडिया हे ‘नमाह पिक्चर्स’च्या सहाय्याने या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.