Karuppu Movie Box Office Collection : दाक्षिणात्य अभिनेता सूर्या आणि त्रिशा कृष्णन यांचा ‘करुप्पु’ हा चित्रपट १५ मे रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून बॉक्स ऑफिसवरही त्याने उत्कृष्ट कमाई केली आहे. प्रदर्शनानंतर दोन आठवडे पूर्ण केलेल्या ‘करुप्पु’ने आता जागतिक स्तरावर आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने दाक्षिणात्य अभिनेते आणि तमिल नाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या ‘वरिसू’च्या जागतिक लाइफटाइम कलेक्शनलाही मागे टाकल्याची माहिती समोर आली आहे.

‘करुप्पु’ने जगभरात ३०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. यासह त्रिशा कृष्णन आणि सूर्या यांच्या या चित्रपटाने २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या विजय आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘वरिसू’च्या जागतिक लाइफटाइम कलेक्शनलाही मागे टाकलं आहे. ‘वरिसू’ने जगभरात २९७.५५ कोटी रुपयांची कमाई केली होती.

त्रिशा व सूर्याच्या चित्रपटाचा सीक्वल येणार?

अशातच आता ‘करुप्पु’चे दिग्दर्शक आर.जे.बालाजी यांनी नुकतंच सोशल मीडियावर चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईची माहिती शेअर केली आहे. त्याने पोस्टमध्ये, “करुप्पु ३०० नॉट आऊट” असं लिहित आनंद व्यक्त केला आहे. ‘करुप्पु’च्या बॉक्स ऑफिसवरील घवघवीत यशानंतर दिग्दर्शकाने या चित्रपटाच्या संभाव्य सीक्वलचे संकेत दिले आहेत. ‘द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “जर या चित्रपटाचा सीक्वल बनला, तर तो ‘देव विरुद्ध राजकारण’ या विषयावर आधारित असावा, अशी माझी इच्छा आहे. ‘मूकुथी अम्मन’ हा चित्रपट ‘ईश्वर विरुद्ध ढोंगी धर्मगुरू’ यावर आधारित होता. तर ‘करुप्पु’मध्ये ‘माझा देव विरुद्ध माझा न्यायाधीश’ (ईश्वर विरुद्ध न्यायव्यवस्था) हा संघर्ष दाखवला आहे. पुढील भागात मला ‘ईश्वर विरुद्ध राजकारण’ हा विषय मांडायचा आहे.”

तो पुढे म्हणाला, “या कल्पनेवर मला आणखी थोडा वेळ काम करायचं आहे. प्रेक्षकांनी पहिल्या चित्रपटाच्या आठवणींमधून बाहेर यावं आणि त्यानंतर त्यांना पहिल्या चित्रपटापेक्षाही अधिक प्रभावी आणि सरस असा अनुभव द्यावा, अशी माझी इच्छा आहे.” ‘करुप्पु’मध्ये अभिनेता सूर्यासह त्रिशा कृष्णन, स्वत: दिग्दर्शक आर.जे.बालाजी यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

दरम्यान, या चित्रपटात सूर्या, त्रिशा व आर.जे.बालाजी यांनी वकिलांच्या भूमिका साकारल्या आहेत. सूर्या यामध्ये दोन वेगवेगळ्या रूपात पाहायला मिळतो. त्यांच्या या चित्रपटातील सीन्स, फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत.