डॉ. विवेक बेळे हे नाटककार चं. प्र. देशपांडे यांच्या जातकुळीतले एक अत्यंत बुद्धिमान लेखक आहेत. त्यांनी निवडलेल्या विषयाच्या खोलात जात, त्याची विचक्षण चिकित्सा करत ते नाटकाची रचना करतात. त्यामुळे प्रेक्षकांनाही त्या विषयाच्या विविध पैलूंचं दर्शन घडतं आणि एक बौद्धिक अनुभव मिळतो. त्यांचं ‘काटकोन त्रिकोण’ हे नाटक यापूर्वीही रंगभूमीवर येऊन गेलेलं आहे. पण त्याची खासीयत अशी, की ते पुन:पुन्हा पाहावंसं वाटतं. म्हणूनच कदाचित आता पुन्हा एकदा ते मंचित केलं गेलं आहे.
या नाटकाचा विषय तसा नवीन म्हणता येणार नाही. दोन पिढ्यांतील अंतर आणि त्यामुळे त्यांच्यात उडणारे खटके, त्याची परिणीती हा या नाटकाचा विषय. सुरुवातीला मनोविश्लेषणाच्या अंगाने जाणारं हे नाटक पुढे क्राइम थ्रिलरमध्ये परावर्तित होतं. तेही हसत खेळत. दोघं तरुण पती, पत्नी आणि सासरे अशा तिघांच्या कुटुंबात होणारे भावनिक, मानसिक ताणतणाव आणि त्यातून घडलेली एक दुर्दैवी घटना असा हा तिढा आहे. भक्ती आणि राहुल हे नोकरदार जोडपं. राहुलचे वडील आबा नको इतके काळजी करणारे. त्यातून जुनाट मतवादी. साहजिकच त्यांचं आणि सुनेचं पटत नाही. त्यातून त्यांच्यात सतत ‘तू तू- मै मै’ होत असतं. पण राहुल त्यांच्यापैकी कुणाचीच बाजू न घेता तटस्थतेची भूमिका घेत असतो. पण भक्ती त्याला त्याच्या वडलांचा कावा, त्यांची भावनिक कट-कारस्थानं काय काय असू शकतात, असतात याबद्दल सतत ब्रेन वॉशिंग करत असते. आणि काहीही झालं तरी त्यासाठी आबाच कसे कारणीभूत आहेत हे राहुलच्या मनावर सतत ठसवत असते. ती जरी गणिताची प्रोफेसर असली तरी गणिती प्रमेयांबरोबरच तिचं मनोविश्लेषणाचं ज्ञानही पक्कं आहे. त्यामुळेच आबांच्या विशिष्ट वागण्यामागे त्यांचे कोणकोणते हेतू, डावपेच असू शकतात याबद्दल ती राहुलची नित्य शिकवणी घेत असते. आणि कर्मधर्मसंयोगानं आबा तसतसेच रिॲक्ट होत जातात आणि राहुलचा भक्तीवर विश्वास बसतो. आपल्या आबांतच काही खोड्या आहेत हे त्याला पटतं. आणि तो तसं आबांना सुनावतोही.
आणि काहीच दिवसांनी आबा गॅलरीतून खाली कोसळून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागतं. हा अपघात असावा असंच राहुल आणि भक्तीचं म्हणणं असतं. पण पोलीस तो आत्महत्येचा प्रयत्न असावा असा संशय व्यक्त करतात. त्याने दोघंही अस्वस्थ होतात. बापट नावाचे पोलीस अधिकारी या घटनेचा तपास करत असतात. त्यांना दोघांवर संशय असतो. त्यांच्या भांडणांमुळेच आबांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असावा असा आरोप ते करतात. त्यासाठी आबा आणि या दोघांचे आतापर्यंतचे संबंध कसे होते, याचा खोलात ते तपास करू लागतात. त्यातून हे समोर येतं, की त्यांच्यात अधूनमधून भांडणं होत होती. त्याच्याच परिणामी आबांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असावा असं मानायला जागा असते. यामुळे दोघंही अडचणीत येतात. बापटांना वरिष्ठांकरवी मॅनेज करायचा राहुल प्रयत्न करतो. पण ते दाद लागू देत नाही.
दुसर्या वेळी ते भक्तीवर संशय व्यक्त करतात. तिनंच आबांचा गॅलरीतून ढकलून खून केला असावा असा निष्कर्ष बापट तिच्या सखोल जाबजबाबातून काढतात. त्यामुळे बेचैन झालेला राहुल बापटांना लाच देऊन भक्तीची या आरोपातून सुटका करण्याचा प्रयत्न करतो. परंतु ते आपल्या निष्कर्षांवर ठाम असतात. तिसर्यांदा ते येतात त्यावेळी ते राहुलच यामागे असावा यादृष्टीनं तपास करतात. आणि त्यांना तसे आवश्यक ते पुरावे मिळतातही. वकील असलेला राहुल त्यांना स्पष्टपणे सांगतो की, एखाद्यावर आरोप निश्चित करून त्याच्या सोयीनं पुरावे गोळा करता येऊ शकतात. मात्र, आता तो स्वत:च अडकलेला असतो आणि बापटांनी आवश्यक ते पुरावे गोळा केलेले असतात. आता
पुढे काय होतं, हे प्रत्यक्ष नाटकात बघणंच योग्य.
लेखक डॉ. विवेक बेळे यांनी मनोविश्लेषणाच्या अंगाने आणि गणिती पद्धतीनं या नाटकाची बुद्धिगम्य रचना केली आहे. पहिल्या अंकात मानवी वर्तन व्यवहार, त्यातील नागमोडी वळणं आणि चाली, त्यांतून निघणारे निष्कर्ष मनोविश्लेषणाद्वारे त्यांनी अत्यंत हुशारीनं, पाहर्णा याला पटेल अशा पद्धतीनं मांडले आहेत. त्याकरवी आबाच कसे घरातील भांडणांना कारणीभूत आहेत, हा भक्तीचा निष्कर्ष आपल्याला (नाइलाजानं का होईना!) पटतो. त्यातील डोकॅलिटी दाद देण्याजोगीच.
दुसर्या अंकात आबांच्या अपघातानंतर पोलिसी खाक्याने या विषयाची उलटतपासणीय मांडणी केलेली आहे. तिला भक्तीच्याच गणिती प्रमेयांचा आणि मनोविश्लेषणाचा आधार घेतलेला आहे. आणि वर राहुलच्या वकिली कौशल्याची फोडणीदेखील. पण आता ही मांडणी करणारे आहेत- पोलीस अधिकारी बापट! एकुणात मती गुंग करणारं हे कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे प्रेक्षक अधिकाधिक नाटकात गुंतत जातात. आणि शेवटी एक चकवा देऊन नाटक संपतं. लेखकानं यातील पात्रं, त्यांचे स्वभावविभाव, त्यांच्यात घडणारे प्रसंग यांचा सखोल अभ्यास करून सिद्धांताधारित त्याची मांडणी केलेली आहे. शिवाय लेखकाचा गणित आणि मानसशास्त्रीय अभ्यासही अत्यंत पक्का आहे. याचं प्रतिबिंब संपूर्ण नाटकात पडलेलं दिसतं. शिवाय भाषिक व्यवहार आणि त्याचं उपयोजन यांतही लेखक माहीर आहे हे पदोपदी जाणवतं.
दिग्दर्शक अजित भुरे यांनीही नाटकाची पिंडप्रकृती जाणून घेऊन प्रयोग मंचित केला आहे. पात्रांच्या उक्ती, कृती यांच्यातील समन्वय आणि त्यांतील विरोधाभास त्यांनी उत्तमपणे बाहेर काढले आहेत. मनोविश्लेषणातील डावपेच, त्यातील राजकारण आणि ते चपखलपणे लागू होण्यातील योगायोग हे त्यांनी अचूकपणे हेरले आहेत. त्यामुळेच बापटांचे कारनामे पाहर्णा याला घोळात घेतात आणि विश्वास ठेवायला भाग पाडतात. ही दिग्दर्शकीय कमाल आहे. लेखकानं मांडलेली थिअरी दिग्दर्शकानं पुरेपूर अंमलात आणली आहे. आशयाच्या अंगानं नाटक त्यामुळेच खणखणीत वाजतं.
नेेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी राहुल-भक्तीचं संपन्न, सुखवस्तू घर त्यातील सर्व तपशिलांसह उत्तम आकारलं आहे. शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेद्वारे यातले नाट्यपूर्ण क्षण गडद, गहिरे केले आहेत. तीच गोष्ट साई पियुष यांच्या संगीताची. कल्याणी कुलकर्णी-गुगळे यांनी वेशभूषेतून पात्रांना व्यक्तिमत्त्व प्रदान केलं आहे. शरद पोंक्षे यांनी आबा आणि इन्स्पेक्टर बापट अशी दुहेरी भूमिका यात साकारली आहे. या दोघांच्याही व्यक्तिमत्त्वांत फरक आहे आणि त्यांनी तो ठळकपणे दर्शविला आहे. आबा हे काळजीवाहू वडील आणि सासरे आहेत. जुनाट मतवादी आहेत. पण तितकेच भावनाशीलही आहेत. आपल्या मुलांनी व्यवहारी असावं, भविष्याचा विचार त्यांनी करावा अशा मताचे ते आहेत. मुलगा आणि सून यांच्याकडून त्यांच्या ‘टिपिकल’ अपेक्षाही आहेत. त्यातून त्यांच्यात आणि सून भक्तीत संघर्ष उभा राहतो. ते भक्तीएवढे इंटलेक्चुअल नाहीत. भावनिकतेनं विचार करणारे आहेत. पण मुळात ते चांगले आहेत. तर दुसरीकडे इन्स्पेक्टर बापट हे पोलिसी डोक्यानं विचार करणारे, खोलात जाऊन आरोपी वा संशयिताच्या कृतीमागील लॉजिक शोधून काढणारे आहेत. त्यामुळे राहुलसारख्या वकिलालाही ते युक्तिवादात हरवू शकतात. ही भिन्न व्यक्तिमत्त्वं शरद पोंक्षे यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक साकारली आहेत. त्यांच्या लकबी, देहबोली, शब्दफेक यांतून ते नेेमकेपणानं व्यक्त होतं. आबांना असलेला भावनिकतेचा पदर बापटांच्या भूमिकेत अजिबात दिसत नाही. तिथं ते कमालीचे श्रूड वाटतात. गणिती डोक्याची आणि मनोविश्लेषणाची थिअरी कोळून प्यायलेली भक्ती- प्रियांका तेंडोलकर यांनी उत्कटतेनं अभिव्यक्त केली आहे. तिची थिअरी गळी उतरवण्याची पद्धतीही लाजवाब. मात्र, शेवटाला आपली चूक कळून आल्यावर ती जमिनीवर येते. या सगळ्या भावावस्था त्यांनी रसरसून जिवंत केल्या आहेत. सुयश टिळक यांनी राहुलच्या भूमिकेत वडील आणि पत्नी यांच्यामध्ये सॅण्डविच झालेला नवरा ठसठशीतपणे वठवला आहे. त्याची घालमेल, कोंडी त्याने उत्कटरीत्या व्यक्त केली आहे. शक्यतो त्यांच्या झमेल्यात पडायचं नाही, ही त्याची स्ट्रॅटेजी. त्याकरता ‘धुरंधर’’चा आधार घेण्याची त्याची युक्ती कधीच काम करीत नाही हे माहीत असूनदेखील तो त्याकडेच नेहमी वळतो. इन्स्पेक्टर बापटांच्या जाळ्यात अडकल्यावर सुटायची धडपड करतानाचं त्याचं केविलवाणेपण तो वकील असला तरी अंतिमत: माणूसच आहे हे सिद्ध करतं. बेफिकीर व तटस्थ मुलगा आणि नवर्याचं त्यांचं बेअरिंग दाद देण्याजोगंच.
एकुणात, एक अत्यंत बुद्धिगामी रचनेचं हे नाटक आपलं उत्तम मनोरंजनही करतं, हे निश्चित.
