सलमान खानच्या आगामी बहुचर्चित ‘भारत’ च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या चित्रपटातील पहिल्या टप्प्याचं चित्रीकरण पार पडलं असून लवकरच त्याच्या दुसऱ्या भागाचंही चित्रीकरण सुरु करण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री कतरिना कैफ झळकणार आहे. सध्या कतरिनाचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये ती सलमानच्या ‘लवयात्री’ या चित्रपटातील ‘छोगाडा तारा’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
सलमानचा ‘लवयात्री’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालण्यास अयशस्वी ठरला आहे. परंतु यातील ‘छोगाडा तारा’ हे गाणं प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हे गाणं बॉलिवूडकरांनाही आवडलं असून अभिनेत्री कतरिना कैफने त्याच्यावर ठेका धरल्याचं दिसून आलं.
कतरिनाने या डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यात तीने या गाण्यामधील काही स्टेप कॉपी केल्या आहेत. यामध्ये तिच्या सोबत अन्य दोन मित्रदेखील दिसून येत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करत कतरिनाने या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कतरिनाचा हा व्हिडिओ प्रेक्षकांना आवडत असून सध्या त्याच्यावर लाईक्सचा पाऊस पडत आहे.
दरम्यान, कतरिना तिच्या आगामी ‘भारत’ चित्रपटामध्ये व्यस्त असून या चित्रपट सलमान खानदेखील झळकणार आहे. यापूर्वी ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटामध्ये या दोघांनी स्क्रिन शेअर केली आहे.