शाहरूख-काजोल, अक्षय कुमार-कतरिना कैफ आणि रणबीर-दीपिका यांच्या ऑनस्क्रिन जोड्या आजवर दर्शकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यामुळेच बॉलीवूडमध्ये येणा-या नव्या कलाकारांची कोणती जोडी प्रेश्रकांच्या मनावर राज्य करणार हा नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. अभिनेत्री कतरिना कैफ आणि सिध्दार्थ मल्होत्रा ही फ्रेश जोडी आगामी चित्रपटात दिसणार असल्याचे समजते. फरहान अख्तरची सहाय्यक नित्या मेहरा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करीत असून, तिच्या आगामी चित्रपटात कतरिना-सिध्दार्थ ही जोडी दिसणार आहे. खरंतर चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा साकारण्यासाठी नित्याने अभिनेता आमीर खान आणि हृतिक रोशनशी संपर्कदेखील साधला होता. परंतु हे दोघे अनुक्रमे ‘दंगल’ आणि ‘मोहनजो दाडो’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त असल्याने त्यांनी नकार दिला. शेवटी सिध्दार्थ मल्होत्राच्या रुपाने नित्याला तिच्या चित्रपटासाठीचा मुख्य अभिनेता सापडला. या चित्रपटाद्वारे कतरिना आणि सिध्दार्थ पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहेत. कतरिना-सिध्दार्थची जोडी चाहत्यांना भुरळ घालण्यात कितपत यशस्वी ठरते ते चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळेलच. सध्या कतरिना ‘फितूर’ आणि ‘जग्गा जासूस’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. ‘फितूर’मध्ये ती आदित्य रॉय कपूरसोबत तर ‘जग्गा जासूस’ चित्रपटात रणबीर कपूरची नायिका आहे.