मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळातील मानाचे पान असलेले ‘कट्यार काळजात घुसली’ हे नाटक चित्रपटाच्या रुपात प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाले आहे. ‘कट्यार काळजात घुसली’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यास चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे. सचिन पिळगावकर, शंकर महादेवन, सुबोध भावे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, साक्षी तन्वरसारख्या कलाकारांच्या मांदियाळीमुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ट्रेलरवरून चित्रपटाची भव्यता लक्षात येते. कट्यार काळजात घुसलीच्या माध्यमातून शंकर महादेवन पहिल्यांदात अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहेत. तर, अभिनेते सचिन पिळगावर यांनी चित्रपटात साकारलेली खाँसाहेबींची भूमिका लक्षवेधी ठरणारी आहे. ही भूमिका आपल्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट भूमिका असल्याचे खुद्द सचिन पिळगावकर यांनी याआधी सांगितले होते. त्यामुळे या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे. संपूर्ण ट्रेलर पाहिल्यानंतर दिग्दर्शनाच्या पदार्पणातच सुबोध भावे बाजी मारून गेल्याचे जाणवते. ट्रेलरला मिळत असलेली पसंती , मातब्बर कलावतांच्या भूमिका, अभिषेकी बुवांच्या सुरांनी सजलेल्या मूळ ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकावर आधारलेली कथा यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरेल अशी अटकळ बांधली जात आहे.