‘कौन बनेगा करोडपती’ हा शो प्रेक्षकांमध्ये फार लोकप्रिय आहे. सध्या या शोचे १३ पर्व सुरु आहे. या शोमध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही एक कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचण्याचे स्वप्न उराशी बाळगून येते. मात्र, यातील काही मोजक्याच स्पर्धकांचे हे स्वप्न पूर्ण होते. नुकतंच या शो ला दुसरा करोडपती मिळाला आहे. मध्यप्रदेशातील छतरपूर या ठिकाणी राहणारे साहिल अहिरवार याचे करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. केबीसी या प्रसिद्ध शो मध्ये साहिल आदित्य अहिरवार याने एक कोटी रुपये जिंकले आहेत. मात्र ७ कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर त्याला देता आले नाही. त्यापूर्वीच त्याने खेळ सोडला.

मध्यप्रदेशातील दुसरा स्पर्धक

साहिल हा मध्यप्रदेशातील डॉ. हरीसिंह गौर विद्यापीठात बी.ए चे विद्यार्थी आहेत. केबीसीच्या टीमने गेल्या आठवड्यात या विद्यापीठाला भेट दिली होती. त्यावेळी या ठिकाणी साहिलसोबत शूट करण्यात आले. केबीसीच्या या हंगामात हॉट सीटवर पोहोचणारा साहिल हा मध्यप्रदेशातील दुसरा स्पर्धक आहे. यापूर्वी या ठिकाणी राहणाऱ्या उपनिरीक्षक असणाऱ्या निमिषा या हॉट सीटपर्यंत पोहोचल्या होत्या. त्यांनी ३ लाख २० हजार रुपये जिंकले होते.

साहिल हा अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. त्याचे वडील नोएडामध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. त्यांचा पगार दरमहिना १५ हजार रुपये आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबात फक्त वडीलच कमाई करतात. मात्र असे असूनही “माझ्या वडिलांनी मला नोकरी करण्यास कधीही जबरदस्ती केली नाही. ते अनेकदा सांगतात की अभ्यास हा महत्त्वाचा आहे. तुम्ही खर्चाची चिंता करु नका,” असे साहिलने सांगितले.

“मला आयएएस अधिकारी व्हायचंय”

“साहिलला लहानपणापासूनच वाचनासह अभ्यासाची आवड आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण एका सरकारी शाळेत झाले. अनेकजण सरकारी शाळेला फार कमी लेखतात. पण माझी शाळा अगदी लहान ठिकाणी असूनही मला माझ्या शिक्षकांनी उत्तम शिक्षण दिले. त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. मी सध्या यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहे. मला आयएएस अधिकारी बनायचे असून देशाची सेवा करायची आहे,” असेही साहिल म्हणाला.

केबीसीमध्ये साहिलला ७ कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न

प्रश्न : गायींप्रमाणे पचनसंस्था असणारा एकमेव पक्षी कोणता आहे जो वनस्पती रवंथ केल्याप्रमाणे खातो आणि त्यातही खास करुन पानं आणि फुलांच्या कळ्याच खाण्यास प्राधान्य देतो?

A. शोबिल सारस

B. होत्जिना

C. फावडा

D. गैलापागोस जलकाग

या प्रश्नाचे योग्य उत्तर बी – होत्जिना असे आहे.

“केबीसीच्या हॉट सीटपर्यंत पोहोचणे माझ्यासाठी कोणतीही कठीण गोष्ट नव्हती. त्यामुळे हा गेम अजिबात त्रासदायक वाटला नाही. मी गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. यामुळे मला अनेक प्रश्नांची उत्तर माहिती आहेत. त्यासोबतच मी या शो मध्ये येण्यापूर्वी खेळ, चित्रपट यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास केला होता. याचा फायदा मला प्रश्नांची उत्तर देतेवेळी झाला,” असेही त्याने सांगितले.