सोनी वाहिनीवर एकाचवेळी काल्पनिक मालिका ‘युद्ध’ आणि ‘क ौन बनेगा करोडपती’ या रिअॅलिटी शोमधून अमिताभ बच्चन यावर्षी छोटय़ा पडद्यावर दमदार प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सध्या दुहेरी आनंदात असलेल्या अमिताभ यांनी ‘केबीसी’चे नवे पर्व ऑगस्टमध्ये सुरू होणार असल्याची माहिती फेसबुकवर आपल्या चाहत्यांना दिली आहे. त्याचवेळी या पर्वात ‘केबीसी’चा नवा चेहरा पहायला मिळणार असल्याची पुडीही अमिताभ यांनी सोडली असल्याने हा नवा चेहरा म्हणजे काय?, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘केबीसीचा हा नवा आकार..केबीसीचा नवा चेहरा ऑगस्टमध्ये पहायला मिळणार आहे. २००० पासून सुरू झालेला हा शो, मध्ये मध्ये विश्रांती घेत परतणारा आणि एक पर्व शाहरूख खानने केलेला हा शो आता या टप्प्यावर पोहोचला आहे’, असे अमिताभ यांनी फेसबुकवर म्हटले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून कायम वलयांकित असूनही अमिताभ बच्चन यांनी छोटय़ा पडद्यावर ‘केबीसी’सारख्या शोमधून सर्वसामान्य प्रेक्षकांशी संवाद साधण्यात सहज यश मिळवले. किंबहुना, या शोच्या माध्यमातून चाहत्यांशी थेट होणारा संवाद, त्यांच्याशी जोडले जाणे हे खुद्द अमिताभ यांनाही इतके भावले आहे की ‘केबीसी’ त्यांच्या प्राधान्ययादीत सर्वात पहिल्या स्थानावर आहे.
‘इथे फक्त पैसेजिंकले जात नाहीत तर मनेही जिंकली जातात. या शोमध्ये येणारे स्पर्धक माझे मन नक्कीच जिंकून घेत आले आहेत’, असे सांगत देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या स्पर्धकांशी संवाद साधणे आपल्याला आवडत असल्याचे अमिताभ यांनी स्पष्ट केले आहे. या शोचे सूत्रसंचालक म्हणून अमिताभ बच्चन यांना प्रत्यक्ष भेटणे, त्यांच्याशी मारलेल्या गप्पा हे स्पर्धकांसाठी आणि प्रेक्षकांसाठीही आकर्षण ठरले असल्यानेच या शोने आजवर यश मिळवले आहे. नव्या पर्वात या शोमध्ये नेमका काय बदल झाला आहे, याच्या माहितीसाठीही पुन्हा अमिताभ बच्चन यांच्या नव्या ट्विटची वाट पहावी लागणार आहे.