Amitabh Bachchan Instagram Post : बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर स्वतःचा एक अद्भुत फोटो शेअर केला आहे. या फोटोसह अमिताभ यांनी प्रेक्षकांच्या आवडत्या रिअॅलिटी शो ‘केबीसी’ला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आनंद साजरा केला आणि या शोबद्दल त्यांनी एक खास नोटदेखील लिहिली आहे.
इन्स्टाग्रामवर अमिताभ यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या नवीन सीझनची तयारी करत असताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी शोचा पहिला भाग ३ जुलै २००० रोजी प्रसारित झाल्याची आठवण करून दिली.
अमिताभ बच्चन यांनी लिहिले, “आज ३ जुलै २०२५ रोजी जेव्हा मी या वर्षीच्या केबीसी सीझनची तयारी करीत होतो, तेव्हा मला केबीसी टीमने सांगितलं की, केबीसीचे ३ जुलै २००० रोजी पहिल्यांदा प्रसारण झाले होते… २५ वर्षे, केबीसीचे आयुष्य!”
‘कौन बनेगा करोडपती’ हा जागतिक स्तरावरील लोकप्रिय शो ‘हू वॉन्ट्स टू बी अ मिलिनेयर’ची हिंदी आवृत्ती आहे. हा शो २००० मध्ये स्टार प्लसवर सुरू झाला होता आणि मूलतः समीर नायर यांच्या नेतृत्वाखालील प्रोग्रामिंग टीमने तो सुरू केला होता. अमिताभ यांनी तिसऱ्या सीझनशिवाय जवळजवळ सर्व सीझनसाठी हा शो होस्ट केला आहे. या सीझनचा होस्ट शाहरुख खान होता.
महानायक अमिताभ बच्चन यांनी बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने जबरदस्त लोकप्रियता मिळवली आहे. त्यांच्या अनेक चित्रपटांशी संबंधित अनेक किस्सेही या शोमधून आपल्याला ऐकायला मिळतात. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी वयाच्या ८० वर्षांचा टप्पा ओलांडला आहे आणि ते अजूनही अभिनयात सक्रिय आहेत.
अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज बिग बींना कोणत्या ओळखीची गरज नाही. बिग बी कायम त्यांच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतात.
अमिताभ बच्चन यांच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. त्याशिवाय बिग बींची एक झलक पाहण्यासाठीही चाहते उत्सुक असतात. सोशल मीडियावरही अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी बिग बी कायम सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात.