‘प्रिय भाई, एक कविता हवी आहे’, ‘कवी जातो तेंव्हा.’ या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद नव्या पिढीमध्ये वाचन केले जात नाही, अशी तक्रार लेखक, प्रकाशक आणि कित्येकदा पालकही करत असतात. अशा वेळी मराठीतील अभिजात साहित्य युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अभिवाचन कार्यक्रम हा उत्तम पर्याय आहे. त्या माध्यमातून ज्येष्ठ लेखक, कवींनी निर्मिलेल्या साहित्यकृती रसिकांपर्यंत पोहोचविणे शक्य होते. साहित्य अभिवाचनाच्या माध्यमातून अभिजात साहित्य रसिक वाचकांशी सुसंवादी असावे या उद्देशातून अनेक जण धडपडीने काम करत आहेत. त्यापैकी ‘प्रिय भाई, एक कविता हवी आहे’ आणि ‘कवी जातो तेंव्हा.’ या अभिरुचीसंपन्न साहित्य अभिवाचनाच्या कार्यक्रमांनी सुवर्णमहोत्सवी प्रयोगाची मजल गाठली आहे. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात शुक्रवारी (१६ ऑगस्ट) सायंकाळी सात वाजता ‘कवी जातो तेंव्हा.’चा तर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे शनिवारी (१७ ऑगस्ट) ‘प्रिय भाई, एक कविता हवी आहे’चा सुवर्णमहोत्सवी प्रयोग होत आहे. रंगकर्मी अमित वझे यांनी या दोन्ही कार्यक्रमांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. डॉ. समीर कुलकर्णी हे या दोन्ही कार्यक्रमांचे मूळ लेखक असून त्यांनीच रंगावृत्ती केली आहे. केवळ मनोरंजन नको तर त्यापलीकडे जाऊन स्वत:ला समृद्ध करणारे असे रसिकांना हवे आहे याची साक्ष देणारे हे दोन्ही कार्यक्रम आहेत. अभिवाचनाच्या प्रयोगामध्ये क्वचितच केला जाणारा संगीताचा वापर, प्रयोगातील महत्त्वाचा घटक असलेली प्रकाशयोजना ही या कार्यक्रमांची बलस्थाने आहेत. एकूणच अभिवाचनाच्या पलीकडे जात रसिकांना नाटकाच्या पातळीवरचा अनुभव देण्याचा अभिनव प्रयोग केला असल्याचे अमित वझे यांनी सांगितले. हेही वाचा >>> अजय देवगणच्या ‘रेड २’ चित्रपटाच्या प्रदर्शनास विलंब ‘आय अॅम फ्री बट नॉट अव्हेलेबल टू एव्हरीवन’, अशी दारावरची पाटी वाचल्यानंतर ‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता’ आणि ‘भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते’ असे तरल काव्यलेखन करणारे ग्रेस यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये कुतूहल चाळवले जाते. ‘कवी जातो तेंव्हा.’ हा कवी ग्रेस यांच्यावरील ललितबंधावर आधारित नाट्य अभिवाचनाचा प्रयोग आहे. कवितांचे वाचन, गायन आणि चर्चा अशा त्रिसूत्रीमध्ये बांधलेल्या या कार्यक्रमाची निर्मिती पुण्यातील ‘रूपक’ या संस्थेने केली आहे. कविता समजून घेण्याची प्रक्रिया नेमकी काय असते? आपल्या आयुष्यात कवीचं नेमकं स्थान काय असतं? कवी जातो तेव्हा भाषेला काय इजा होते या सगळ्याविषयी हा कार्यक्रम भाष्य करणारा आहे. या कार्यक्रमात गजानन परांजपे, अमित वझे, जयदीप वैद्या, अंजली मराठे आणि निनाद सोलापूरकर यांचा सहभाग आहे. अपर्णा केळकर, जयदीप वैद्या आणि निनाद सोलापूरकर यांचे संगीत आहे. एका वयामध्ये ग्रेस यांच्या कवितांचे वाचन केले होते, पण कार्यक्रमाच्या सादरीकरणामध्ये या कवितेकडे परत पाहताना, कार्यक्रमातून अभिव्यक्त करताना त्या कवितेचे नव्याने आकलन झाल्याची प्रचीती नेहमी येते. कलाकार म्हणून केवळ मीच नाही तर, आनंद घेणारे रसिकही अंतर्मुख होतात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रंगमंचावरील आणि पडद्यामागचे कलाकार असे सगळे मिळून आम्ही ‘ग्रेस’राग मांडत आहोत, अशी भावना गजानन परांजपे यांनी व्यक्त केली. ‘प्रिय भाई, एक कविता हवी आहे.’ हा सांगीतिक नाट्य अभिवाचनाचा आविष्कार आहे. भाई म्हणजे पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई यांच्याशी संबंधित खऱ्या प्रसंगांवर आधारित असलेल्या अभिवाचनाचे गद्या आणि संगीत हे अविभाज्य भागच त्याचे वेगळेपण सिद्ध करणारे आहेत. कवी आणि कविता या दोन्हीवर या दोघांचे नितांत प्रेम. यासंदर्भाने ‘अनुभव’ मासिकामध्ये आलेल्या ‘तप:स्वाध्याय’ या ललितबंधावर आधारित हा प्रयोग आहे. वैयक्तिक अनुभवावर आधारित हे लेखन कवितेच्या अवकाशातून सुरू होत आपल्या जगण्याचा, त्यामागच्या प्रेरणांचा आणि त्यातून लाभलेल्या समृद्धीचा मागोवा घेतं. प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे सुनीताबाई देशपांडे यांची भूमिका साकारतात. कार्यक्रमातील सांगीतिक भाग अंजली मराठे, निनाद सोलापूरकर, जयदीप वैद्या यांनी तर, गद्या भाग मुक्ता बर्वेसह अमित वझे आणि मानसी वझे यांनी सांभाळला आहे. प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक यांनी रेखाटलेल्या चित्रांचा कार्यक्रमात खुबीने वापर करून घेतला आहे. अपर्णा केळकर, निनाद सोलापूरकर आणि जयदीप वैद्या यांचे संगीत आहे. वेगळ्या धाटणीच्या लेखनाचे पन्नास प्रयोग होणं हीच मुळात मोठी गोष्ट आहे. कविता, मराठी भाषा यापासून लोक लांब जात आहेत की काय असे वाटत असताना अशा प्रकारचा कार्यक्रम तितकाच लोकप्रिय होतो हे सुचिन्ह आहे. अशा प्रयोगाला प्रतिसाद मिळतो तेव्हा चांगलं वाटतं. पुलं आणि सुनीताबाई हे ‘सॉफ्ट कॉर्नर’ आहेतच. त्यांच्याविषयी नितांत आदर आणि घरातील मोठी व्यक्ती असावी असे मराठी घरांमध्ये स्थान आहे. ‘आहे मनोहर तरी’चे वाचन, त्यांच्या काव्य अभिवाचनाच्या चित्रीकरणाचे काही भाग यू-ट्यूबवर पाहिले होते. मात्र, असा कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाल्याने त्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी वाचनात आल्या. केवळ संहितेपुरते मर्यादित न राहता सकस गोष्टी वाचता आल्या आणि त्या वाचनामुळे प्रयोगापुरतीच नाही तर, आयुष्यभरासाठी समृद्ध झाले, अशी भावना मुक्ता बर्वे यांनी व्यक्त केली.