एक सामान्य स्त्रीसुद्धा ज्ञानाच्या जोरावर अशक्य ते शक्य करुन दाखवू शकते, हे अमरावतीच्या बबिता ताडे यांनी सिद्ध करुन दाखवलंय. प्रतिमहा अवघे पंधराशे रुपये कमावणाऱ्या बबिता यांनी ‘केबीसी’च्या अकराव्या पर्वात एक कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आणि प्रश्नाचं अचूक उत्तर देत त्या करोडपतीसुद्धा झाल्या. दीड हजार ते एक कोटी रुपयांचा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खिचडी बनवणाऱ्या बबिता यांच्याकडे ना मोबाइल फोन होता ना कम्प्युटर. तरीसुद्धा दररोज वृत्तपत्रे वाचून, बातम्या ऐकून त्या स्वत: प्रत्येक गोष्टीची माहिती करुन घ्यायचा. हॉटसीटवर बसून आत्मविश्वासपूर्ण खेळणाऱ्या बबिता यांच्याकडे पाहून अभिनेते अमिताभ बच्चनसुद्धा भारावून गेले होते. या शोदरम्यान त्यांनी बबिता यांना एक खास भेटवस्तूसुद्धा दिली.

एक कोटी रुपये जिंकल्यानंतर तुम्ही त्या रकमेचं काय करणार असा प्रश्न बिग बींनी त्यांना विचारला. त्यावर बबिता म्हणाल्या, ”मी स्वत:साठी मोबाइल फोन विकत घेईन, कारण माझ्याकडे फोन नाही.” कुणी स्वत:चं घर घेण्याची इच्छा व्यक्त करतात तर कुणी कर्ज फेडणार असल्याचं सांगतात, अशात बबिता यांनी केवळ एक मोबाइल फोन विकत घेण्याची इच्छा व्यक्त केल्यावर बिग बींनाही आश्चर्य वाटलं. ”आमच्या घरी एकच मोबाइल फोन आहे आणि घरातील सर्वजण कॉल करण्यासाठी तोच फोन वापरतात,” असं बबिता यांनी सांगितलं. त्यानंतर शोदरम्यान बिग बींनी स्वत: बबिता यांना एक मोबाइल फोन भेट दिली.

वाचनाची आवड असणाऱ्या बबिता यांनी सहजपणे एक कोटी रुपयांपर्यंत मजल गाठली. त्यानंतर सात कोटी रुपयांच्या प्रश्नाबाबत ठाम नसल्याने त्यांनी शो सोडण्याचा निर्णय घेतला. शो सोडल्यानंतर बबिता यांनी सात कोटी रुपयांसाठी प्रश्नाचं उत्तर दिलं आणि ते उत्तर अचून निघालं. त्यामुळे अचूक उत्तर देऊनसुद्धा त्या सात कोटी रुपये जिंकू शकल्या नाहीत.