बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांचे देशातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. एवढचं नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील बिग बींचे अनेक चाहते आहेत. त्यातीलच एक म्हणजे अभिनेता जॅकी श्रॉफ. नुकतीच जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी यांनी ‘कौन बनेगा करोडपती १३’या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी बॉलिवूडमधील या दोन दमदार सेलिब्रिटींसोबत बिग बींनी धमाल केली. येत्या आठवड्यात हा खास एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या शोमध्ये बिग बींनी जॅकी श्रॉफला एक अशी भेटवस्तू दिली आहे. ज्यामुळे जॅकी श्रॉफच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. बिग बी अमिताभ बच्चान यांनी जॅकी श्रॉफला ऑटोग्राफ केलेली स्पेशल डिझाइनर ‘बो-टाई’ भेट म्हणून दिली आहे. जॅकी श्रॉफने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत आनंद व्यक्त केलाय. पोस्टमध्ये त्याने लिहिलं, “अमिताभ बच्चन सर काही वर्षांपूर्वी मी तुमची ऑटोग्राफ मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेव्हा ते शक्य झालं नाही. कौन बनेगा करोडपतीमध्ये मला संधी मिळाल्यावने मी स्वत:ला रोखू शकलो नाही. इतका सुंदर बो-टाय माझ्यासाठी ऑटोग्राफ करून दिल्याबद्दल खूप धन्यवाद. मी हे कायम जपून ठेवेन” अशी पोस्ट जॅकी श्रॉफ यांनी लिहिली आहे.


येत्या एपिसोडमध्ये बिग बी अमिताभ बच्चन बॉलिवूडच्या लोकप्रिय अशा सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ यांच्यासोबत गेम खेळताना दिसणार आहेत. गेमसोबतच अनेक धमाल किस्से यावेळी प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहेत.