KBC 13: सात कोटींसाठी विचारण्यात आला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भातील ‘हा’ प्रश्न; देता आलं नाही उत्तर

एक कोटी जिंकल्यानंतर तिला ह्युंदाईची ऑरा ही कारही भेट देण्यात आली. या गाडीची किमान किंमत पाच लाख ९७ हजार इतकी आहे. मात्र तिला सात कोटींच्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही

himani bundela
केबीसीच्या १३ व्या सिझनची पहिली करोडपती स्पर्धक (फोटो सोनीवरुन साभार)

छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ हा टीव्ही रिअ‍ॅलिटीशोला १३ व्या पर्वामध्ये दुसऱ्याच आठवड्यामध्ये पहिली करोडपती स्पर्धक हिमानी बुंदेलच्या रुपाने मिळालाय. सध्या सोनी टीव्हीवर ‘कौन बनेगा करोडपती’चे १३ पर्व सुरु असून या पर्वामध्ये हिमानीने एक कोटी रुपये जिंकले आहेत. या पर्वात एवढी मोठी रक्कम जिंकणारी ती पहिलीच स्पर्धक ठरली आहे. मात्र हिमानीला सात कोटीच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. तिने एक कोटी रुपये घेऊन गेम क्वीट करण्याचा निर्णय घेतला.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना हिमानीने तिला आपण एक कोटी जिंकल्यावर विश्वासच बसत नसल्याचं म्हटलं आहे. आपण एवढ्या पैशांचं काय करणार याचा कधी विचारच केला नव्हता असंही हिमानी प्रांजळपणे सांगते. तसेच अमिताभ यांच्यासमोर बसणं हेच आपल्यासाठी स्वप्न होतं असंही तिने म्हटलं आहे. हिमानीचं गणितामधील कौशल्य पाहून अमिताभ यांनाही आश्चर्याचा धक्का बसल्याचं कार्यक्रमामध्ये अनेकदा दिसून आलं. हॉटसीटपर्यंत पोहचणं हेच अनेकांचं स्वप्न असतं. त्यामुळे किती रक्कम जिंकली हे फार लांबची गोष्ट झाली. मला मात्र दोन्ही गोष्टी करता आल्याने अजूनही मला हे स्वप्नच वाटत असल्याचं हिमानीने म्हटलं आहे.

एक कोटीसाठी कोणता प्रश्न विचारण्यात आला?

एक कोटींसाठी हिमानीला  दुसऱ्या महायुद्धामध्ये फ्रान्समध्ये ब्रिटनची हेर म्हणून काम करताना नूर इनायत खानने कोणतं टोपणनाव वापरलं होतं?, असा प्रश्न विचारण्यात आलेला. या प्रश्नाला

A) वेरा एटकिस
B) क्रिस्टीना स्कारबेक
C) जुलीएन आईस्त्रर
D) जीन-मेरी रेनियर

असे चार पर्याय देण्यात आलेले. हिमानीने बराच वेळ घेत कोणत्याही लाइफलाइनची मदत न घेता डी असं उत्तर दिलं. जे बरोबर आलं आणि ती या सीझनची पहिली करोडपती ठरली. यानंतर हिमानीचे वडील, बहीण साऱ्यांना अश्रू अनावर झाले. हिमानीला ह्युंदाईची ऑरा ही कारही भेट देण्यात आली. या गाडीची किमान किंमत पाच लाख ९७ हजार इतकी आहे.

सात कोटींसाठी कोणता प्रश्न विचारण्यात आला?

सात कोटींसाठी हिमानीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. बराच वेळ विचार केल्यानंतर एक कोटींवरुन थेट तीन लाख २० हजारांवर येण्याऐवजी आपण शो क्वीट करुयात असा निर्णय हिमानीने घेतला.

सात कोटींसाठी हिमानीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समध्ये सादर केलेल्या प्रबंधाचं शीर्षक काय होतं ज्यासाठी त्यांना १९२३ साली डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली?, असा प्रश्न विचारण्यात आलेला.

A) द वॉण्ट्स अ‍ॅण्ड मीन्स ऑफ इंडिया
B) द प्रॉब्लेम ऑफ द रुपी
C) नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया
D) द लॉ अ‍ॅण्ड लॉयर्स

असे चार पर्याय देण्यात आलेले. हिमानीने बराच वेळ विचार करुन आपल्याला सी पर्याय म्हणजेच नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया हे उत्तर वाटत असल्याचं सांगितलं. मात्र तिने शेवटी धोका फार मोठा असल्याचं सांगत गेम क्वीट केला. या प्रश्नाचं बरोबर उत्तर बी म्हणजेच द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे होतं.

या पैशांचं काय करणार?

सात कोटी जिंकता आले नसले तरी दृष्टीहीन असूनही हेमानीने एक कोटी रुपये जिंकल्याचा आनंद होस्ट असणारे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासहीत सर्व उपस्थित प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. हिमानीचा २०११ साली एक भीषण अपघात झाला. यामध्ये तिची दृष्टी गेली. मात्र इच्छाशक्तीच्या जोरावर या २५ वर्षीय तरुणीने आपलं शिक्षण पुन्हा सुरु केलं आणि आता ती एका शाळेत शिक्षिका आहे. या पैशांमधून दिव्यांग व्यक्तींसाठी तिला काम करायचं असून करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये वडिलांचा रोजगार केल्याने त्यांनाही एखादा उद्योगधंदा सुरु करण्यासाठी मदत करण्याची तिची इच्छा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kbc 13 himani bundela is this year first crorepati could not answer 7 crore rs question about dr babasaheb ambedkar scsg

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या