सध्या ‘अक्का’ या सीरिजमुळे चर्चेत असलेली दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि तिचा नवरा अँटनी थट्टिल हे लग्नापूर्वी तब्बल १५ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. २०२४ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. नुकत्याच एका मुलाखतीत कीर्तीने सांगितलं की ती १७ वर्षांची असताना प्रेमात पडलेली. विशेष म्हणजे, कीर्तीची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री मेनका यांना लेकीच्या प्रेमसंबंधांबद्दल तिची डायरी वाचल्यानंतर समजलं होतं.

कीर्ती सुरेशच्या आईला डायरी वाचून समजलं प्रेमप्रकरण

“मी माझ्या नवऱ्याला खूप आधीपासून डेट करत होते. खरं सांगायचं तर, बारावीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेचच आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो. मी कॉलेजमध्ये असताना आईने माझी डायरी वाचली. त्यात आमच्या नात्याबद्दल सगळं काही लिहिलं होतं. त्यावर ती मला म्हणाली, मी तुझी आई आहे, त्यामुळे तुझी डायरी वाचू शकते.या सगळ्यात घडलेली एक वाईट गोष्ट म्हणजे, त्यानंतर मी डायरी लिहिणंच बंद केलं. मला पूर्वी डायरी लिहायला खूप आवडायचं, पण आता ती डायरी नेमकी कुठे आहे, हेसुद्धा मला माहीत नाही. ती पुन्हा मिळावी, अशी माझी खूप इच्छा आहे. पण मला असं वाटतं की, आईने ती डायरी जाळून टाकली असावी,” असं कीर्तीने कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

अँटनी थट्टिलबरोबरच्या नात्याबद्दल बोलताना कीर्ती सुरेश म्हणाली, “मी वयाच्या १७व्या वर्षी त्याला डेट करायला सुरुवात केली होती. तो माझ्यापेक्षा सात वर्षांनी मोठा आहे.” त्यांचं नातं प्रसिद्धीच्या झोतात न येता खासगी ठेवणं किती कठीण होतं, असं विचारलं असता कीर्ती म्हणाली की, यासाठी फार काही प्रयत्न करावे लागले नाहीत. “खरं तर हे खूप सोपं होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आम्ही दोघंच कधी सुट्टीसाठी फिरायला गेलो नाही. आम्हाला मित्रमैत्रिणींचा सहवास आवडतो. त्यामुळे आम्ही नेहमी मित्रांच्या मोठ्या ग्रुपसोबतच फिरायला जायचो. आम्ही एकत्र फोटो पोस्ट केले तरी हा व्यक्ती माझा बॉयफ्रेंड आहे, हे कोणालाही समजलं नसतं. त्यामुळे आमचं नातं खासगी ठेवणं खूप सोपं होतं,” असं तिने सांगितलं.

आंतरधर्मीय लग्नाला आई-वडिलांचा होता विरोध

परस्पर मित्रमैत्रिणींच्या माध्यमातून त्यांची ओळख झाल्याचं सांगत कीर्ती म्हणाली, “आमची पहिली भेट डिसेंबर २००९ मध्ये झाली आणि जानेवारी २०१० मध्ये आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. २०२४ मध्ये आम्ही लग्न केलं. अँटनी ख्रिश्चन असल्यामुळे साहजिकच घरातून विरोध झाला. माझ्या कुटुंबीयांना आमच्या नात्याबद्दल समजावण्यासाठी मला बराच वेळ लागला. मी अभिनेत्री होण्यापूर्वीपासूनच अँटनी मला ओळखत होता. हीच सर्वात चांगली गोष्ट आहे. आम्ही दोघंही एकत्रच मोठे झालो,”

तब्बल १५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर कीर्ती सुरेश आणि अँटनी थट्टिल यांनी १२ डिसेंबर २०२४ रोजी लग्नगाठ बांधली. गोव्यात मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पारंपरिक तामिळ ब्राह्मण आणि मल्याळी ख्रिश्चन पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला. २०२५ मध्ये Galatta India ला दिलेल्या मुलाखतीत लग्नाबद्दल बोलताना कीर्ती म्हणाली, “खरं सांगायचं तर, हा एक स्वप्नवत क्षण होता. पण याला स्वप्न म्हणावं की नाही, हेच मला कळत नाही. कारण पळून जाऊन लग्न करण्याची भीती आम्हाला अनेकदा स्वप्नातही सतावत होती. त्यामुळे याला स्वप्न म्हणता येईल की नाही, माहीत नाही. पण त्या क्षणी माझं मन आनंदाने भरून आलं होतं. तो आमच्यासाठी खूप भावुक क्षण होता, कारण आम्हाला नेहमीच असं लग्न करायचं होतं.”

दरम्यान, कीर्ती सुरेश नुकतीच दिग्दर्शक धर्मराज शेट्टी यांच्या ‘अक्का’ या नेटफ्लिक्सवरील सीरिजमध्ये झळकली होती. या सीरिजमध्ये तिच्याबरोबर राधिका आपटेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होती.