बॉक्स ऑफिसवर सध्या रणवीर सिंहचा सीक्वल चित्रपट ‘धुरंधर २’ धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाबरोबरच १९ मार्च रोजी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कमी बजेटमध्ये बनलेला ‘यूथ’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. विशेष म्हणजे, ‘धुरंधर २’ च्या वादळासमोर ‘यूथ’ने केवळ आपली पकडच मजबूत ठेवली नाही, तर हा चित्रपट जबरदस्त कमाई देखील करत आहे. अगदी तिसऱ्या वीकेंडलाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. ‘यूथ’चे आतापर्यंतचे कलेक्शन जाणून घेऊयात.
‘यूथ’मध्ये केन करुणास याने मुख्य भूमिका साकारली असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. या चित्रपटाच्या कमाईत तिसऱ्या वीकेंडला मोठी वाढ दिसून आली. ‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, १६ व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या शुक्रवारी या चित्रपटाने सुमारे १.८५ कोटी कमावले. १७ व्या दिवशी कमाईत आणखी वाढ झाली आणि चित्रपटाने सुमारे १.९२ कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
‘यूथ’ने तिसऱ्या वीकेंडला किती कमाई केली?
यूथच्या कमईत सर्वात मोठी वाढ १८ व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या रविवारी पाहायला मिळाली. या चित्रपटाने सुमारे २ कोटी रुपयांची कमाई केली. या वीकेंडच्या कमाईसह ‘यूथ’चे भारतातील एकूण कलेक्शन सुमारे ५५.५२ कोटी झाले आहे. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगली कामगिरी करत आहे. १८ व्या दिवशी परदेशात ०.१५ कोटींची भर पडल्याने तिथली कमाई ११ कोटी झाली आहे. आता या चित्रपटाचे जगभरातील एकूण कलेक्शन ६६.५२ कोटी झाले आहे. हा तमिळ चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप यशस्वी ठरला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे बजेट फक्त ६ कोटी आहे आणि यात कोणताही मोठा स्टार नाही.
‘यूथ’ने तमिळनाडूमध्ये सर्वात जास्त कमाई केली. या चित्रपटाने सुमारे ४२.२५ कोटी कमाई फक्त तमिळनाडूत केली. कर्नाटक मधून ३.७५ कोटी, तर तेलगू राज्यांतून (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा) ३.७५ कोटींचे कलेक्शन झाले आणि उर्वरित भारतात या सिनेमाने सुमारे १.२५ कोटींची कमाई केली आहे.
‘यूथ’ची स्टार कास्ट
‘यूथ’ या ‘कॉमेडी ड्रामा’ चित्रपटात केन करुणास याच्याबरोबर सूरज वेंजरामूडू, देवदर्शिनी, अनिष्मा अनिलकुमार, प्रियांशी यादव आणि मीनाक्षी दिनेश या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे केन करुणास यानेच या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.
