KGF 2 Co-Director Kirtan Nadagouda: कन्नड भाषेतील लोकप्रिय ठरलेला केजीएफ चित्रपट हिंदीत डब झाल्यामुळे संपूर्ण जगात पोहोचला. केजीएफच्या दोन्ही भागांना भारतासह जगभरात चांगलीच प्रसिद्धी मिळाली. दुसरा भाग प्रदर्शित झाल्यानंतर देशभरात चित्रपटाने कोट्यवधी रुपये कमावले होते. ‘केजीएफ – चॅप्टर २’ चे सह दिग्दर्शक असलेले किर्तन नाडागौडा यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याची बातमी समोर येत आहे. किर्तन नाडागौडा आणि त्यांची पत्नी समृद्धी पटेल यांच्या साडेचार वर्षांच्या मुलाचा लिफ्टमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, नाडागौडा यांचा मुलगा सोनार्श के. नाडागौडाचा अपघात इतक्या वेगात झाला की, त्याच्या कुटुंबियांना त्याला वाचविण्याची संधी मिळाली नाही.
कन्नड प्रभाने दिलेल्या बातमीनुसार, अवघे चार वर्षांचे वय असलेल्या सोनार्श नाडागौडाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला. नाडागौडा कुटुंबियांच्या जवळच्या लोकांनी सांगितले की, हे दुःख सहन करण्यापलीकडचे आहे. सोनार्श अतिशय गोड, उत्साही मुलगा होता. त्याच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
कन्नड चित्रपटसृष्टीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही ही बातमी वेगाने पसरली. चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. अभिनेते, तंत्रज्ञ आणि हितचिंतकांनी शोकाकुल कुटुंबियांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला.
आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची पोस्ट
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनीही सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी किर्तन नाडागौडा आणि समृद्धी पटेल यांना या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो, यासाठी प्रार्थना केली.
किर्तन नाडागौडा हे गेल्या अनेक वर्षांपासून कन्नड चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. केजीएफ सारख्या लोकप्रिय चित्रपटाचे त्यांनी सह दिग्दर्शन केले होते. तसेच इतर चित्रपटांच्या निर्मितीतही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. केजीएफने कन्नड व्यतिरिक्त हिंदी आणि इतर दाक्षिणात्य भाषांमध्ये चांगले यश मिळवले होते.
