दाक्षिणात्य सुपरस्टार यशचे ‘केजीएफ’ आणि ‘केजीए चॅप्टर २’ दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालले. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. केजीएफ चित्रपट फेम कृष्णा जी राव यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा जी राव हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांना उपचारासाठी बंगळुरुतील सीता सर्कलजवळील विनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. वृद्धापकाळाने ते आरोग्यविषयक विविध समस्यांना तोंड देत होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. होंबले फिल्म्स प्रोडक्शनने ट्विट करुन कृष्णा जी राव यांच्या निधनाची बातमी दिली.

कृष्णा जी राव गेल्या अनेक वर्षांपासून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत कार्यरत होते. त्यांनी आतापर्यंत अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. केजीएफ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात ते अभिनेता यशबरोबर झळकले होते. त्यामुळे ते प्रसिद्धीझोतात आले. या चित्रपटानंतर त्यांनी जवळपास ३० चित्रपटांत काम केले.

अभिनेता यश स्टारर आणि प्रशांत नील दिग्दर्शित KGF चित्रपटानंतरच कृष्णा जी राव यांना विशेष लोकप्रियता मिळाली. त्यांनी KGF या चित्रपटात एक विशेष भूमिका साकारली. त्यांचे पात्र रॉकी (यश) च्या कथेला एक वळण देणारे ठरते. यशच्या या चित्रपटात कृष्णा हे एका अंध व्यक्तीच्या भूमिकेत दिसले. त्यांच्या या पात्रामुळे रॉकीमधील माणुसकीला जाग येते आणि तो अन्यायाचा बदला घेतो, असे कथानक दाखवण्यात आले होते. एखाद्या छोट्या भूमिकेतही कृष्णा जी राव आपल्या दमदार अभिनयाने छाप पाडायचे. त्यांच्या या शैलीमुळे त्यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kgf fame actor krishna g rao is passes away south star yash film nrp
First published on: 08-12-2022 at 09:10 IST