यशाने हुरळून जायचं नाही आणि अपयशाने खचून जायचं नाही, हा अक्षय कुमारचा फंडा आजही कायम आहे. त्यामुळे कधीकाळी चित्रपटांमुळे का होईना त्याला मिळालेली ‘खिलाडी’ ही उपाधी सार्थ ठरते. आत्ताही ‘बच्चन पांडे’चं अपयश पचवून तो त्याच्या ‘पृथ्वीराज’ या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. कान महोत्सवाला जायच्या तयारीत असताना त्याला कोविडचे निदान झाले आणि त्याच्या धावपळीला काही अंशी विराम लागला असला तरी तो मात्र मी खणखणीत बरा आहे, असं सांगत ‘पृथ्वीराज’च्या प्रसिध्दी कार्यक्रमात गुंतला आहे.

‘माझी तब्येत आता उत्तम आहे. मी गेले चार-पाच दिवस विश्रांती घेतली आहे. प्रत्येकालाच कधी ना कधी या अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो, असं मला वाटतं. फक्त आमच्या व्यवसायात असं आहे की आम्ही सतत मुखपट्टी घालून वावरू शकत नाही. चित्रीकरण स्थळीही आम्ही इतक्या लोकांमध्ये असतो, इतक्या कलाकारांना भेटत असतो की करोनाची टांगती तलवार आमच्या मनात कायम असते. अशा परिस्थितीत घरून काम करण्याचा पर्यायही आमच्याकडे नाही. तरीही सुरुवातीला जेव्हा करोनाचा उद्रेक झाला होता तेव्हा मी घरी बसून सहा-सात जाहिरातींचे चित्रीकरण केले होते’, अशी आठवणही अक्षयने सांगितली. यशराजची निर्मिती असलेला ‘पृथ्वीराज’ हा त्याच्या कारकीर्दीतील महत्त्वाकांक्षी, बहुप्रतीक्षित असा चित्रपट आहे. त्यामुळे त्याच्यासाठीची धावपळही अंमळ जास्तच.. सध्याच्या ट्रेण्डप्रमाणे हा चित्रपटही हिंदीबरोबरच तमिळ आणि तेलुगू भाषेतही डब केला जाणार आहे. पण मुळातच सगळय़ा भारतीयांना आवडेल असा हा चित्रपट आहे का, असा प्रश्न त्याला माध्यमांशी संवाद साधत असताना विचारला गेला. या प्रश्नाला काही दिवसांपूर्वीच्या हिंदी – राष्ट्रभाषा यावरून झालेल्या वादाची पार्श्वभूमी आहे हे तोही जाणून आहे. त्यामुळे मुळातच ‘पॅन इंडिया फिल्म्स’ वगैरे या संकल्पना आपल्या समजण्यापलीकडच्या आहेत, असं सांगून तो मोकळा होतो. प्रत्येक चित्रपट हा चालला पाहिजे आणि त्याच्याशी संबंधित कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ प्रत्येकाला त्यातून पैसा मिळाला पाहिजे एवढंच मला कळतं, असं तो म्हणतो.

‘ही दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी, ती उत्तरेकडची.. हा भेदभावच मला मुळात मान्य नाही’, असं तो म्हणतो. आमच्या सगळय़ांचं चित्रपट उद्योग हे एकच कार्यक्षेत्र आहे. अशाच पध्दतीने ब्रिटिशांनी आपल्या देशात येऊन आपल्यामध्ये भिंती उभ्या केल्या. आपल्याला वेगळं केलं आणि आपल्यावर राज्य केलं, हा इतिहास माहिती असूनही आपण त्यापासून काहीच धडा घेत नाही आहोत, असं दिसतं. ज्या दिवशी आपण सगळे एकाच उद्योगाचा भाग आहोत हे सगळय़ांच्या लक्षात येईल आणि त्या एकत्रित भावनेने काम केलं जाईल तेव्हा गोष्टी खूप चांगल्या पध्दतीने बदलू लागतील, अशी आशाही अक्षय व्यक्त करतो.

अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ या चित्रपटाबरोबर ‘विक्रम’ आणि ‘मेजर’ असे दोन दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित होत आहेत. याचं दडपण घेण्यापेक्षा हे तिन्ही चित्रपट चांगले चालावेत, अशी इच्छा तो व्यक्त करतो. चित्रपट चालले तर व्यवसाय उभा राहणार आहे. लाखो लोक या व्यवसायावर अवलंबून असतात. त्यामुळे सगळे चित्रपट चालले पाहिजेत. ‘सबकी फिल्में चलें..’ अशी एकच प्रार्थना तो करतो. सध्या अमूक एक प्रकारचे चित्रपट चालत आहेत, वगैरे विचार करताना तो दिसत नाही. काही चित्रपट सध्या चांगले चालतायेत, काही नाही.. हा आत्ताच्या परिस्थितीचा प्रश्न आहे. परिस्थिती बदलेल आणि मग गोष्टी पुन्हा बदलतील, असं सांगतानाच कुठल्याच मुद्दय़ावरून सध्या कोणीच भेदभाव करू नये. ज्याला जे उत्तम जमतं ते त्याने करत राहावं, असं तो पुन्हा पुन्हा आग्रहाने सांगतो.

‘रिमेक’वरून वाद कशाला?

मध्यंतरी मला तू ‘रिमेक’ का करतो आहेस, असा प्रश्न विचारला गेला. रिमेक केले म्हणजे आपल्याकडे उत्तम लिहिणारेच नाहीत, असा अर्थ त्यातून काढला जातो. कशासाठी?.. रिमेक केले तर काय हरकत आहे, असा उलटप्रश्न अक्षय करतो. माझा ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट खूप चालला, तो तेलुगूमध्ये रिमेक केला गेला. ‘राऊडी राठोड’ हा दाक्षिणात्य चित्रपट खूप लोकप्रिय ठरला म्हणून तो मी हिंदीत केला आणि इथेही त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मग तुम्हाला यात अडचण काय आहे? एखादं गाणं रिमिक्स केलं तरी आरडाओरडा सुरू होतो. आमच्याकडे हुशारी नाही म्हणून आम्ही रिमेक करतो, असं म्हटलं जातं. पण खरंच एखादा दाक्षिणात्य चित्रपट आम्हाला खूप आवडला तर तो आम्ही हिंदीत रिमेक का करू नये? मग आपण पु्न्हा त्यांची भाषा आणि आमची भाषा करत वाद घालत बसतो. आपल्या देशातील सगळय़ाच भाषा खूप सुंदर आहेत. आपण प्रत्येक जण आपापल्या मातृभाषेत बोलतो. आणि कुठलीही मातृभाषा मग ती तमिळ असो, तेलुगू असो वा हिंदी.. त्या चांगल्याच आहेत. अडीचशे वर्ष आपल्या देशाने गुलामी अनुभवली आहे, तरीही आपल्याला एकत्र येण्याचं, एकतेने राहण्याचं महत्त्व का लक्षात येत नाही. आपण एकत्र नाही आहोत ही दुर्दैवी बाब आहे, पण कधी ना कधी आपल्याला महत्त्व लक्षात येईल, असं तो म्हणतो.

‘अपयशी चेहरा घेऊन वावरू शकत नाही’

‘बच्चन पांडे’ हा अक्षयचा बिग बजेट चित्रपट तिकीटबारीवर सपाटून आपटला. प्रत्येक वेळी अपयशाला सामोरं जाताना त्याच पध्दतीच्या भावभावना मनात असतात, असं तो म्हणतो. मी काही लागोपाठ १३-१४  फ्लॉप चित्रपट दिलेले नाहीत. तरीही माझ्या कारकीर्दीत एक काळ असा होता जेव्हा माझे ८ ते ९ चित्रपट चालले नव्हते. मी नेहमी म्हणतो, चित्रपट एकदा शुक्रवारी आपटला की फारतर रविवापर्यंत तुम्हाला वाईट वाटतं. सोमवारी तुम्हाला परत एकदा मनाची उभारी घेऊन दुसऱ्या चित्रपटाचं काम सुरू करावंच लागतं. तुम्ही सतत अपयश चेहऱ्यावर घेऊन सगळीकडे वावरू शकत नाही. तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घेतला पाहिजे. नव्या चित्रपटाच्या सेटवर आनंदी वृत्तीनेच काम केलं पाहिजे. चांगले चित्रपट तेव्हाच होतात, जेव्हा तुम्ही मनापासून तुमच्या कामाचा आनंद घेतलेला असतो, असं तो सांगतो.