बलात्कारपीडित स्त्रीची दास्तां कुणासाठीच नवी नाही. जगाच्या इतिहासातील मानवी जन्मापासूनच ती सुरू आहे. आदिम अवस्थेत प्रारंभी माणसांमध्ये नातेसंबंधांची वीण, व्यक्तिगत आवडनिवड वगैरे गोष्टी नव्हत्याच. तेव्हा मुक्त लैंगिक संबंध प्रचलित होते. परंतु अर्थात बोलून दाखवलं नाही, तरीही तेव्हाही प्रत्येक व्यक्तीची आवडनिवड ही असणारच. त्यामुळे त्याविरोधात जाऊन स्थापित होणारे लैंगिक संबंध हे तेव्हाही ‘बलात्कारा’च्याच व्याख्येत येत असणार. परंतु तेव्हा मानवाला बलात्कार या संकल्पनेचीच माहिती नसल्याने ते जोरजबरदस्तीने केलेले संबंध इतक्यापुरतेच मर्यादित राहत असावेत. परंतु उत्क्रांतावस्थेत जसजशी मानवी समाजाची आणि नातेसंबंधांची वीण घट्ट होत गेली, व्यक्तिगत आवडनिवडीला महत्त्व येत गेलं असणार, तसतसा अशा जबरदस्तीच्या बलात्कारांविरोधात आवाज उठवला जाऊ लागला असणार. आणि आता तर हजारो वर्षांच्या मानवी उत्क्रांतीनंतर आणि व्यक्तिवादाचा उदय झाल्यानंतर तर बलात्कार ही अत्यंत घृणास्पद गोष्ट आणि व्यक्तिस्वातंत्र्यावरील आघातच मानली जाऊ लागली आहे. आणि ते योग्यच आहे. ही जाणीव जरी समाजात आता निर्माण झालेली असली तरीही आजदेखील जगात मिनिटाला काही बलात्काराच्या घटना घडत असतात आणि त्यांस स्त्रिया बळी पडत असतात. अलीकडे तर पुरुषावरही बलात्कार झाल्याच्या अपवादात्मक घटना घडताना दिसतात. अर्थात त्या नियमाला अपवाद म्हणूनच.
…तर अशा घटनांना बळी पडलेल्या स्त्रीच्या आयुष्याचे कायद्यासमोर आणि समाजातही कसे धिंडवडे निघतात, हे सर्वश्रुत आहेच. त्यावर आधारित कथा, कहाण्या, कादंर्ब या, चित्रपट, नाटक अशा अभिव्यक्तीच्या विविध कलामाध्यमांतून लिहिलं, बोललं आणि व्यक्तही केलं जातं. मात्र, त्यानं समाजात काहीएक बदल घडून आलाय असं मात्र दिसत नाही. याचं कारण पुरुषजातीची मूलत: स्खलनशीलता.
तर ते असो. याच विषयावर प्रवीण धोपट लिखित आणि डॉ. अनिल बांदिवडेकर दिग्दर्शित ‘खो’ हे नाटक अलीकडेच रंगभूमीवर आलं आहे. प्रवीण धोपट यांच्या एका कथेलाच दिलेलं हे नाट्यरूप आहे.
चित्रा ही कोवळ्या वयातली तरुणी आदिवासींच्या जीवनावर शोधप्रबंध लिहिण्यासाठी दुर्गम आदिवासी भागात गेलेली असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार होतो आणि तिचं आयुष्यच उद्ध्वस्त होतं. खरं तर तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर शेखरही त्यावेळी तिच्याबरोबर असतो. पण त्याला बेदम मारहाण करून आणि त्याला झाडाला बांधून हा बलात्कार करण्यात आलेला असतो.
यानंतर सुरू होते ती पोलीस चौकशी. ही चौकशी म्हणजे स्त्रीच्या स्त्रीत्वाचा जितका म्हणून अपमान होईल तोच त्यातून अधिकाधिक होत असतो. त्यास सामोरे जाण्यापेक्षा बलात्कार परवडला असं स्त्रीला कधी कधी होतं.
अर्थात या घटनेनंतर बलात्कारित स्त्रीला(च) समाजात, जवळच्यांना तोंड दाखवणं मुश्कील होऊन बसतं. चित्राही अशीच तोंड लपवून घरात बसलेली असताना तिची बहीण जाई मात्र तिच्या वतीने प्रसार माध्यमं, सोशल मीडिया, महिला आयोग यांच्यासमोर तिची लढाई लढत असते. गृहिणी असलेली तिची आई सुरुवातीला घाबरून गेलेली असते. पण बलात्कारपीडितेला समाजकल्याण खात्याकडून काही मदत मिळण्याची शक्यता दिसल्यावर त्या आशेनं ती चित्राला सोबत घेऊन सरकारी खात्यांची पायधूळ झाडत राहते. पण त्यातून पदरी पडते फक्त उदरनिर्वाहासाठीची शिलाई मशिन. तीही देताना समाजकल्याण अधिकारी त्याबदल्यात चित्राकडून भलतीच अपेक्षा धरत असतो, ते वेगळं. नंतर तर आई बलात्कारित चित्राचं भांडवल करून मिळेल त्या मार्गाने पैसे कमावण्याचा मार्ग धरते. चित्राचे वडील मुळातच पापभिरू असल्याने खचलेले असतात. जाईही सुरुवातीला चित्राची लढाई आवेशानं लढून शेवटी थकून शस्त्रं म्यान करते आणि त्याबद्दल चित्रालाच दोष देते.
यातून बाहेर कसं पडायचं हे चित्राला कळत नाही. आत्महत्येचे विचारही डोक्यात येतात. पण तशी हिंमत होत नाही. असंंच एकदा तिला सोशल मीडियावर एका वेश्या स्त्रीनं आपल्यावर झालेल्या बलात्काराची सांगितलेली कर्मकहाणी तिच्या पाहण्यात येते. त्यातून ती त्या सोशल इन्फ्ल्यूएन्सरमार्फत त्या वेश्येचा संपर्क नंबर मिळवते आणि तिला जाऊन भेटते. ती स्त्री ज्या रोखठोक पद्धतीनं तिच्यावरील बलात्काराच्या घटनेला भिडलेली असते, ते पाहून चित्रा थक्क होते. जीवनाला बेधडक सामोरं जाण्याशिवाय यातून सुटण्याचा दुसरा मार्ग नाही, हे त्या स्त्रीचं म्हणणं तिला पटतं. आणि ती आत्महत्येचा मार्ग सोडून जीवनाला सामोरा जायचा निर्णय घेते…
लेखक प्रवीण धोपट यांनी आजच्या काळातील संवेदनशील बलात्कारपीडित स्त्रीची कहाणी यातून मांडली आहे. तीत अनेक अविश्वास वाटावा अशी वळणंवाकणं येतात. पण ती स्वीकारून चित्राच्या कथेतील विषण्णतेला प्रेक्षकांना सामोरं जावं लागतं. त्यात एक धागा अनवधानाने (की कळूनसवरून?) निसटून गेलेला आहे. चित्राचा पूर्वाश्रमीचा प्रियकर- जो तिला आदिवासी भागात जाताना सोबत करतो- त्या शेखरचं पुढे काय झालं? काय होतं? आपल्या व्यक्तिगत दु:खापुढे चित्राही त्याला र्वा यावर सोडून देताना दिसते. शेेखरचं पुुढे काय झालं, हे तिच्या गावीही राहत नाही. असो.
चित्राची ही सुन्न करणारी कथा अत्यंत वास्तवदर्शी रीतीनं रंगमंचावर आकारली आहे. तिच्या भावभावनांचे बदलते कंगोरे, आयुष्याला तिनं जसं समोर येईल तसं सामोरं जाणं… आणि शेवटी आपल्या आयुष्याबरोबरची इतरांची फरफट थांबावी म्हणून तिनं घेतलेला निर्णय… हे सगळंच हृदयद्रावक आहे. मन सुन्न करणारं आहे. प्रवीण धोपट यांची निरनिराळ्या वळणांवरून वाटचाल करणारी ही कथा मंचान्वित करणं तसं अवघडच. परंतु दिग्दर्शक डॉ. अनिल बांदिवडेकर यांनी हे शिवधनुष्य लीलया पेललं आहे. एकातून एक प्रसंगांची मालिका गुंफणं- तीही एकपात्री नाटकातून- ही तारेवरची कसरत त्यांनी साध्य केली आहे. विशेषत: चित्राच्या मानसिकतेचे हिंदोळे त्यांनी सूक्ष्मरीत्या अधोरेखित केले आहेत. त्यासाठी त्यांच्याकडे होती ती कलाकाराची देह-संवादबोली. तिचा त्यांनी पुरेपूर वापर केला आहे.
जान्हवी दरेकर या कलावतीनं ती प्रत्ययकारीतेनं मूर्त केली आहे. बलात्कारपीडित स्त्री कोणकोणत्या ट्रॉमातून जाते याचं चालतं-बोलतं चित्रच त्यांनी आपल्या सर्वांगसुंदर अभिनयातून प्रतीत केलं आहे. त्यांची अवघी देहबोली बलात्काराच्या शिसारी आणणार्या अनुभवाचं सदेह दर्शन घडवते. त्या अनुभवातून प्रेक्षकांनाही जायला लावते. एकातून एक प्रसंगमालिका चितारताना जान्हवी दरेकर व्यक्तीनुरूप संवादशैली, देहबोली आणि अभिव्यक्ती सहजतेनं बदलत जातात. त्या प्रत्येक पात्राच्या अंतरंगात त्या परकायाप्रवेशानं शिरतात. कलाकार म्हणून आपण एक विलक्षण रसायन आहोत याचाच त्या प्रत्यय देतात. या प्रयोगात तांत्रिक बाबीही महत्त्वाची भूमिका बजावतात. देवेंद्र प्रभुदेसाई यांचं सांकेतिक नेपथ्य नाटकाची जातकुळी ठरवतं. उन्मेष वीरकर यांची प्रकाशयोजना प्रसंगबदल आणि पात्राची मन:स्थिती दृगोचर करते. शरद वेटे यांची संगीत संकल्पना श्रद्धा वेटे-मोकाशी यांच्या कंठस्वरातून पात्राच्या मूड्सना उठाव देते.
‘खो’ एक संस्मरणीय अनुभव देतं, यात शंकाच नाही.
