scorecardresearch

साताऱ्यात ‘मुलगी झाली हो’ मालिकेचं शूटींग नियमित सुरु, गैरसमजातून घडला प्रकार, पंचायत समितीने दिली माहिती

गाव पातळीवर ग्रामस्थांची बैठक घेऊन याबाबतचे स्पष्टीकरण देऊ अशी माहिती पंचायत समितीने दिली.

अभिनेते किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून त्यांना काढण्यात आल्यानंतर या चर्चा सुरु झाल्या आहेत. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणानंतर आता गुळुंब ग्रामपंचायतीने मालिकेच्या चित्रीकरणास परवानगी नाकारल्याबाबतचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत होतं. नुकतंच गुळुंब ग्रामपंचायतीने याबाबतचे स्पष्टीकरण देत चित्रीकरण व्यवस्थित सुरु असल्याचे सांगितले आहे.

मुलगी झाली हो’ या मालिकेचे चित्रीकरण सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील मयुरेश्वर (गुळुंब) गावात नियमित सुरु आहे. किरण माने यांना सहकलाकारांशी गैरवर्तन आणि त्यांच्याबद्दलच्या अनेक तक्रारींमुळे व्यवस्थापनाने मालिकेतून काढण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यानंतर या मालिकेच्या चित्रीकरण वाई तालुक्यात नियमित सुरु असल्याचे दिसून आले. तसेच गुळुंब ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती शिवाजी माने यांचे परवानगी नाकारल्याचे पत्र समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या.

“कोणता बाप आपल्या लेकीसाठी अपशब्द उच्चारेल?” ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील ‘माऊ’चा किरण मानेंना सवाल

दरम्यान नुकतंच पंचायत समितीचे माजी उपसभापती महादेव मस्कर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. या मालिकेचे चित्रीकरण करण्यात परवानगी नाकारलेली नाही. गुळुंब गावाच्या सरपंच स्वाती शिवाजी माने यांनी हा प्रकार गैरसमजातून केला आहे. गाव पातळीवर ग्रामस्थांची बैठक घेऊन याबाबतचे स्पष्टीकरण देऊ अशी माहिती पंचायत समितीचे माजी उपसभापती महादेव मस्कर यांनी दिली.

‘स्टार प्रवाह’ वाहिनी आणि ‘मुलगी झाली हो’ मालिकेचे चित्रीकरण मागील दीड वर्षापासून मयुरेश्वर ,कवठे , भुईंज (ता वाई )येथे सुरू आहे. या मालिकेतील एक कलाकार किरण माने यांना सहकलाकारांशी गैरवर्तन आणि अंतर्गत तक्रारीमुळे मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. याबाबत माध्यमातून वाद पुढे येत राहिले. मात्र अशा कोणत्याही वादाबाबत ग्रामस्थांना माहिती नाही. हा त्यांचा अंतर्गत वाद आहे याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. तसेच याबाबत ग्रामस्थांनी चित्रीकरण थांबविण्याची कोणताही सूचनाही केलेली नाही, असेही ते म्हणाले.

‘शरद पवार योग्य तो न्याय करतील’ किरण माने प्रकरणावर मालिकेतील कलाकारांची प्रतिक्रिया

किरण माने यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आले आहे. राजकीय पोस्ट करून दबाव निर्माण करण्याचा माने प्रयत्न करत आहेत, असे स्थानिक व्यवस्थापक सचिन ससाणे यांनी सांगितले.

गेल्या दीड वर्षापासून या परिसरात चित्रीकरण सुरू आहे, यासाठी व्यवस्थापनाचे कलाकारांसह ४५ कर्मचारी नियमित येथे वास्तव्यास आहेत. स्थानिक गावपातळीवर आतापर्यंत या चित्रीकरणामुळे कोणतेही वाद झालेले नाहीत. त्यामुळे चित्रीकरण बंद करण्याचा प्रश्नच नाही. या चित्रीकरणामुळे स्थानिकांना रोजगार, ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळते. आमच्या गावात नियमित वेगवेगळ्या मालिकेचे चित्रीकरण सुरु असते. त्यामुळे गावाला परिसराला आणि वाई तालुक्याला कोणीही बदनाम करू नये, असेही गावकऱ्यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kiran mane controversy satara gulumb grampanchayat give permission for shooting star pravah mulgi zali ho serial nrp

ताज्या बातम्या