आपल्या विनोदी अभिनयाने मराठी रसिकजनांचे दिलखुलास मनोरंजन करणारे अस्सल विनोदी अभिनेते व रंगकर्मी म्हणून सतीश तारेंना ओळखले जाते. मराठी सिनेसृष्टीतील अभिनयाचा सम्राट अशीही त्यांची ओळख होती. मराठी रंगभूमी, छोटा पडदा आणि चित्रपटसृष्टी या सर्वच आघाड्यांवर तारे यांनी आपल्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाने आणि दमदार अभिनयाने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. विनोदाचा हुकमी एक्का म्हणून तारे प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध होते. मराठी भाषेवर आधारित तसेच प्रसंगोचित विनोद किंवा कोट्या करण्यात तारे यांचा हातखंडा होता. नुकतंच अभिनेता किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी सतीश तारेंबद्दल मोठी पोस्ट लिहिली आहे.
किरण माने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध विषयांवर भाष्य करत असतात. नुकतंच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी सतीश तारे यांचा फोटो शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी एक मोठी पोस्ट शेअर केली.




“…मला खूप भरुन येतंय”, अभिनेते किरण मानेंची फेसबुक पोस्ट चर्चेत
किरण माने यांची फेसबुक पोस्ट
“…आमच्यातनं जाऊन तुला आज नऊ वर्ष झाली ! नाटकात तू खाली पडल्यावर, शरीराची खत्त्तरनाक नागमोडी वळणं घेत वर उसळी मारायचास… टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. तशीच मागच्या वर्षीची ही पोस्ट ‘सर्रकन’ वर आलीय भावा…
तुला काय म्हणू गड्या? अष्टपैलू? हरहुन्नरी? गुणी?? अफलातून-कलंदर-अवलिया??? नाय नाय नाय नाय.. ही सग्ग्गळी विशेषणं फिकी पडतील इतका महान होतास तू ! पण बेफिकीरपणे जगलास आणि त्याच बेफिकीरीने गेलास. आम्हा सगळ्यांचं डोंगराएवढं नुकसान करून ठेवलंयस माहितीय का तुला…?
तू कधीच कुणाची नक्कल केली नाहीस. ‘स्वत:ची एक वेगळीच श्टाईल असलेला’ खराखुरा विनोद’वीर’ होतास तू… साध्या-साध्या वाक्यांच्याही विशिष्ठ उच्चारातून – बिनचूक शब्दफोडीतून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा तुझ्यासारखा अफाट नट मी आजवर पाहिला नाही. तुझी ‘आंगीक लवचिकता’ केवळ अ फ ला तू न ! नादखुळा !! जबराट !!!
तू निव्वळ ‘महान’ अभिनेता होतास. उत्तम लेखक-दिग्दर्शक-गायक-वादक… ‘ऑल इन वन’ होतास राव ! हार्मोनियम, गिटार, तबला अशा वाद्यांवर सफाईनं हात फिरायचा तुझा… पण…अनेक मनस्वी कलावंतांना असलेला एक ‘शाप’ तुलाही होता…नाहीतर ही वेळ होती का यार जायची??
आज किती नाट्यरसिकांना माहिती असंल की आपण काय गमावलंय… आपल्यातनं जो गेला तो किती ‘महान’ होता…माहितीय??? बोलता-बोलता कधी मी सतीश तारेची तुलना चार्ली चॅप्लीन आणि जिम कॅरीशी केली तर तुला फारसं न पाहिलेल्या लोकांना वाटतं ‘किरण माने जरा अतीच कौतुक करतोय.’
मी जेव्हा कधी विनोदी नाटक बघतो, तेव्हा क्वचित कधीतरी ‘हा रोल सतीश तारेने केला असता तर !?’ हा विचार मनाला शिवला तरी मी पुढचं नाटक पाहू शकत नाही…! मी कुणाला कमी लेखत नाही. आजही चांगले-शैलीदार विनोदवीर आपल्यात आहेत, पण तरीही ‘सतीश तारे’ या अवलियाचे जबराट-छप्परतोड ‘परफाॅरमन्सेस’ ज्यांनी पाहिलेत, त्यांना माझं म्हणणं मनापास्नं पटंल. असो…तरीही आज मी लै लै लै हसणारय सतीश. खळखळून – मनापासून हसणारय.. कारण आज मी तुझं ‘ऑल लाईन्स क्लीअर’ हे नाटक बघणारय…
डोळ्यात पाणी येईपर्यन्त हसणारय. लैच लवकर गेलास रं भावा. एवढा ‘टायमिंग’चा बाप तू …पण ‘जाण्याचं’ टायमिंग चुकवलंस दोस्ता…
तुला प्रत्यक्ष भेटून चिक्कार वेळा केलाय.. आज परत एकदा तुला कडकडीत सलाम. लब्यू,” असे किरण माने यांनी म्हटले आहे.
‘मुलगी झाली हो’ मालिका बंद होणार कळताच अभिनेते किरण मानेंची पोस्ट, म्हणाले “कटकारस्थान रचून…”
किरण माने यांनी फेसबुकवर शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टवर त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहे. “असा विनोदवीर पुन्हा होणे नाही. कॉपी पेस्ट छापील, विनोदी कलाकार अनेक सापडतील. पण सतीश तारे सारखा कोहिनूर हिरा पुन्हा दुसरा होणे नाही.”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने त्याच्या पोस्टवर केली आहे. तर एकाने “सतिश तारे म्हणजे बाप माणूस” असे म्हटले आहे.